मतदान केंद्रांवर मतदारांना आवश्यक सुविधा पुरवणार

0
6

>> उत्तर गोवा जिल्हाधिकाऱ्यांची माहिती; प्रशासनाकडून मतदानासाठी तयारी सुरू

लोकसभा निवडणुकीच्या मतदानासाठी येणाऱ्या मतदारांना मतदान केंद्रावर आवश्यक सोयी-सुविधा पुरवल्या जाणार आहेत. मतदारांना पिण्याचे पाणी, मदत कक्ष, प्रसाधनगृहे, दिव्यांग व वृद्ध मतदारांसाठी रॅम्प, व्हिलचेअर आदींची सोय करण्यात येईल. तसेच उन्हापासून बचावासाठी मंडपाचीही सोय करण्यात येईल, अशी माहिती उत्तर गोव्याच्या जिल्हाधिकारी डॉ. स्नेहा गित्ते यांनी काल पत्रकार परिषदेत दिली. लोकसभा निवडणुकीसाठी उत्तर गोवा मतदारसंघ सज्ज होत असून, प्रशासनाकडून आतापर्यंत कोणकोणती कामे हाती घेण्यात आली आहेत व सुरक्षेच्या दृष्टीने कोणती पावले उचलण्यात येत आहेत, याची सविस्तर माहिती देखील त्यांनी दिली. यावेळी उत्तर गोवा पोलीस अधीक्षक अक्षत कौशल उपस्थित होते.

येत्या 7 मे रोजी गोव्यात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीची सर्व तयारी सध्या जोरात सुरू आहे. या मतदारसंघात एकूण 5 लाख 77 हजार 977 एवढे मतदार आहेत. त्यापैकी 2 लाख 80 हजार 260 हे पुरुष मतदार आहेत, तर 2 लाख 97 हजार 714 मतदार महिला आहे. 3 मतदार हे तृतीयपंथीय आहेत. तसेच 4955 मतदार हे दिव्यांग आहेत.

उत्तर गोवा मतदारसंघात 20 विधानसभा मतदारसंघांचा समावेश असून, त्यात मांद्रे मतदारसंघापासून प्रियोळ मतदारसंघाचा समावेश आहे. मतदानासाठी येणाऱ्या मतदारांना उन्हाच्या झळा बसू नये, यासाठी सर्व मतदान केंद्रांवर मंडप उभारण्यात येणार आहे. त्याशिवाय तेथे पिण्याचे पाणी, प्रसाधनगृहे, रॅम्प, व्हिलचेअर व मदत कक्ष आदींची सोय केली जाईल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

चांगली टक्केवारीचा इतिहास
उत्तर गोवा मतदारसंघात सदैव चांगले मतदान झाल्याचे यापूर्वी झालेल्या निवडणूक टक्केवारीवरुन दिसून आले आहे. 2022 च्या गोवा विधानसभा निवडणुकीत उत्तर गोव्यात तब्बल 81.15 टक्के एवढे, तर 2019 च्या लोकसभा निवडणुकीत 76.82 टक्के एवढे मतदान झाल्याचे गित्ते यांनी सांगितले. यंदा मतदानाच्या टक्केवारीत वाढ व्हावी यासाठी महिला मतदार, दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक व तृतीयपंथीय मतदार यांच्यावर खास लक्ष केंद्रित करण्यात येणार असल्याचे डॉ. गित्ते म्हणाल्या.

23 भरारी पथके
निवडणूक आचारसंहितेचा भंग केला जाऊ नये यासाठी 23 भरारी पथके, 16 गस्ती पथके, 12 व्हिडिओद्वारे पाहणी करणारी पथके, तसेच 20 व्हिडिओद्वारे गस्त घालणारी पथके कार्यरत करण्यात आली असल्याचे डॉ. गित्ते म्हणाल्या.

उमेदवारांच्या खर्चावरही देखरेख
उमेदवारांच्या खर्चाच्या तपशिलावर लक्ष ठेवण्यासाठी देखील पथके तयार करण्यात आली आहेत. शेजारच्या राज्यांतून काळा पैसा, मद्य, शस्त्रे आदी आणली जाऊ नयेत यावर लक्ष ठेवण्यासाठी तपासणी नाक्यांवर आंतरराज्य सुरक्षा पथके ठेवण्यासाठी सिंधुदुर्ग व बेळगाव जिल्ह्यातील अधिकाऱ्यांबरोबर गोव्याच्या अधिकाऱ्यांच्या बैठका झाल्याचे डॉ. गित्ते यांनी सांगितले. या बैठकीत गोवा, महाराष्ट्र व कर्नाटकचे आयकर अधिकारी, अबकारी अधिकारी व पोलीस अधिकारी सहभागी झाले होते, अशी माहिती त्यांनी दिली.
तक्रार कुठे नोंदवणार?
निवडणूक मतदान यंत्रे व व्हीव्हीपॅट्स आल्तिनो येथील मुलांच्या हॉस्टेलमध्ये ठेवण्यात येतील. निवडणूक झाल्यानंतर ती आल्तिनो येथील मल्टिपर्पज सायक्लोन शेल्टरमध्ये ठेवण्यात येतील. लोकसभा निवडणुकीच्या काळात. कुणी मद्य, काळा पैसा आदी आणत असल्याचे आढळून आले, तर लोकांनी 0832-2225383 या क्रमांकावर अथवा 9699793464 ह्या व्हॉट्सॲप क्रमांकांवर संपर्क साधून तक्रार नोंदवावी, असे डॉ. गित्ते यानी सांगितले.

सुरक्षेसाठी पोलीस देखील सज्ज
मतदान शांततेत पार पडावे यासाठी भारतीय निवडणूक आयोगाने केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाची नियुक्ती केली आहे. उत्तर गोव्यात यापूर्वीच केंद्रीय राखीव पोलीस दलाची एक तुकडी पोचली असल्याचे उत्तर गोवा पोलीस अधीक्षक अक्षत कौशल यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

20 पिंक, 43 आदर्श अन्‌‍ 40 केंद्रे पर्यावरणपूरक
उत्तर गोवा मतदारसंघातील मतदान केंद्रांची संख्या ही 863 एवढी आहे एकूण मतदान केंद्रांपैकी 20 मतदान केंद्रे ही ‘पिंक’ अर्थात गुलाबी मतदान केंद्रे असतील. ह्या केंद्रांवर सर्व निवडणूक कर्मचारी ह्या महिला असतील. 5 मतदान केंद्रांची जबाबदारी ही दिव्यांग कर्मचाऱ्यांकडे सोपवण्यात येणार आहे. त्याशिवाय 43 आदर्श मतदान केंद्रे असतील. 40 केंद्रें ही हरित व पर्यावरणपूरक केंद्रे असतील, असे डॉ. स्नेहा गित्ते यांनी स्पष्ट केले.

दिव्यांग अन्‌‍ वृद्धांना घरातून मतदानाची सोय
85 वर्षांवरील मतदारांनी, तसेच 40 टक्के अपंगत्व असलेल्या लोकांनी मतदानाकडे दुर्लक्ष करू नये, म्हणून त्यांच्यासाठी टपाल मतदानाची सोय करण्यात आली आहे. अशा लोकांना त्यांच्या घरी बसून मतदान करता यावे यासाठी निवडणूक पथक त्यांच्या घरी जाणार आहे. त्यांच्या अधिकृत निवासस्थानावरुन त्यांना मतदान करता येणार आहे. निवडणूक कर्मचाऱ्यांना यापूर्वीच दोन टप्प्यात त्यासाठी आवश्यक ते प्रशिक्षण देण्यात आले आहे, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.