राष्ट्रीय लोकदल एनडीएमध्ये सामील

0
13

>> अखिलेश यादव यांच्याशी बिनसल्याने आरएलडी एनडीत

जयंत चौधरी यांचा राष्ट्रीय लोक दल पक्ष एनडीएमध्ये सामील झाला आहे. दिल्लीत गृहमंत्री अमित शहा आणि भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची भेट घेतल्यानंतर चौधरी यांनी ही घोषणा केली. अखिलेश यादव यांच्या समाजवादी पक्षावर नाराज होत चौधरी यांनी एनडीएमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. गृहमंत्री शहा यांनी राष्ट्रीय लोक दलाने एनडीएमध्ये प्रवेश केल्याने शेतकरी आणि गरिबांच्या उन्नतीसाठी आमचा संकल्प आणखी मजबूत होणार असल्याचे म्हटले आहे.

जयंत चौधरी यांनी मांडलेल्या जागावाटपाच्या सूत्राशी समाजवादी पक्ष सहमत नाही. त्यामुळे त्यांनी एनडीएसोबत जाण्याचा निर्णय घेतला. सपाने आरएलडीला ज्या सात जागा देण्याचे आश्वासन दिले होते त्यात मेरठ, कैराना, मुझफ्फरनगर, मथुरा, हाथरस, बागपत, बिजनौर आणि अमरोहा येथील प्रत्येकी एक जागा समाविष्ट आहे.

यासोबतच सपाने आपल्या चिन्हावर निवडणूक लढवण्याची ऑफर दिली होती. जयंत चौधरी यांच्या नाराजीचे हे प्रमुख कारण ठरले. याशिवाय सपाने जयंत यांना कैराना, मुझफ्फरनगर, बिजनौर आणि मेरठ या 4 जागांसाठी आपल्या उमेदवारांची यादी दिली होती. म्हणजेच या जागांवर चिन्ह आरएलडीचे असले असते, पण उमेदवार सपाचे असायचे. जयंत चौधरी यांना हे मान्य नव्हते. यामुळे ते अखिलेश यादव यांच्यावर नाराज झाले. माजी पंतप्रधान चौधरी चरणसिंग यांना भारतरत्न देऊन भाजपने जयंत आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबाचे स्वप्न पूर्ण केले. याशिवाय भाजपने आरएलडीला बागपत आणि बिजनौर लोकसभा जागा, एक राज्यसभेची जागा आणि यूपी सरकारमध्ये मंत्रीपद देऊ केले. यामुळेच जयंत यांनी काल एनडीएमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला. आता भाजप आणि आरएलडी एकत्र आल्याने जाट मतांचे विभाजन थांबणार आहे.