सरकारच्या भ्रष्टाचाराचा टप्प्याटप्प्याने पर्दाफाश

0
5

>> काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांचा इशारा; विविध खात्यांत मोठा भ्रष्टाचार सुरू

गोवा सरकारच्या विविध खात्यांत मोठा भ्रष्टाचार चालू असून, या भ्रष्टाचाराचा पर्दाफाश काँग्रेस पक्ष येणाऱ्या काळात टप्प्याटप्याने करणार असल्याचे काल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. यासंबंधीचे पुरावे काँग्रेसकडे असून पुराव्यांसकट हा भ्रष्टाचार जनतेसमोर आणण्यात येणार असल्याचे पाटकर म्हणाले.

नुकत्याच झालेल्या गोवा विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात काँग्रेस पक्षाच्या तिन्ही आमदारांनी चांगली कामगिरी केल्याचे सांगून सरकारची भ्रष्टाचाराची प्रकरणेही उघड केली. काँग्रेसच्या आमदारांनी विधानसभेत सरकारला जे प्रश्न विचारले होते, त्या प्रश्नांची एक तर चुकीची उत्तरे देण्यात आली किंवा उत्तरे दिलीच गेली नाहीत, असा आरोपही पाटकर यांनी केला.
लोहखनिज डंप धोरण असो अथवा गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाने परवाने दिलेले उद्योग शेतजमिनीत कसे उभारले जातात, या प्रश्नांची उत्तरे देताना मुख्यमंत्र्यांची त्रेधातिरपिट उडाल्याचे पाटकर म्हणाले.

राज्याची अर्थव्यवस्था असो अथवा रोजगार किंवा कामांची अंमलबजावणी करणे अशा सर्वच बाबतीत सरकारला पूर्णपणे अपयश आल्याचा आरोप पाटकर यांनी केला. काँग्रेस सरकारच्या काळात 35 हजार कोटींचा खाण घोटाळा झाल्याचा आरोप करणाऱ्या भाजप सरकारला ह्या कथित घोटाळ्यातील एकही पैसा वसूल करता आला नसल्याचे ते म्हणाले.
सभापती रमेश तवडकर यांनी कला आणि संस्कृती खात्यात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करून नंतर हा आरोप मागे घेतला. वीज खात्याची व अन्य खात्यांची थकबाकी ही तब्बल 500 कोटी रुपये एवढी आहे. ती सरकार वसूल करीत नाही. दुसरीकडे, गरिबांना त्यांच्या योजनांचे पैसे मिळत नाहीत. आणि सरकार पर्पल महोत्सव, इफ्फी आदींवर शेकडो कोटी खर्च करीत असल्याचा आरोपही त्यांनी केला.