धारबांदोड्यातील अपघातात तरुणी ठार

0
0

धारबांदोडा येथील उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोरील गतिरोधकाचा अंदाज न आल्याने दुचाकीवरून खाली कोसळून झालेल्या अपघातात निफा फर्नांडिस (26, रा. रिवण) या तरुणीचा मृत्यू झाला. दुचाकीचालक जॉली फर्नांडिस (26, रा. सांगे) हा किरकोळ जखमी झाला. सदर अपघात काल रात्री 8 वाजण्याच्या सुमारास घडला. या गतिरोधकावर वारंवार अपघात घडत असल्याने मंगळवारी सकाळी स्थानिक लोकांनी रास्ता रोको करण्याचा इशारा दिला आहे.

प्राप्त माहितीनुसार, जीए-09-एस-1516 क्रमांकाची दुचाकी तिस्क-उसगाव येथून सांगे येथे जात होती. धारबांदोडा येथील उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोरील गतिरोधकाचा अंदाज न आल्याने दुचाकीवरून उसळून निफा फर्नांडिस ही तरुणी गंभीर जखमी झाली, तर दुचाकीचालक किरकोळ जखमी झाला. जखमींना त्वरित 108 रुग्णवाहिकेतून पिळये प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले; पण आरोग्य केंद्रात पोहचण्यापूर्वीच तरुणीचा मृत्यू झाला. फोंडा पोलिसानी या अपघाताचा पंचनामा केला.

या ठिकाणच्या गतिरोधकाजवळ वारंवार अपघात घडत असल्याने स्थानिक लोकांनी तो गतिरोधक काढण्याची मागणी केली होती; पण गतिरोधक काढला नसल्याने सोमवारी रात्री झालेल्या अपघातात एका तरुणीला प्राण गमावावा लागला. भविष्यात पुन्हा अपघात घडू नये यासाठी मंगळवारी सकाळी स्थानिक लोकांनी रास्ता रोको करण्याचा निर्णय घेतला आहे. रस्ता रोको केल्यास फोंडा-बेळगाव मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प होणार आहे.