मंत्रिमंडळ फेरबदलाच्या चर्चेचे तानावडेंकडून खंडन

0
4

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा राज्य मंत्रिमंडळात फेरबदलाच्या चर्चेने जोर धरला आहे. मात्र काल भाजप लोकसभा निवडणूक समितीच्या बैठकीनंतर प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे यांनी पत्रकारांशी बोलताना या चर्चेचे खंडन केले. मंत्रिमंडळातील फेरबदलाच्या वृत्तामध्ये कोणतेही तथ्य नाही. मुख्यमंत्र्यांना मंत्रिमंडळात फेरबदल करण्याचा पूर्ण अधिकार आहे; मात्र मुख्यमंत्र्यांनी राज्य मंत्रिमंडळातील फेरबदलाच्या विषयावर पक्ष संघटनेशी कोणतीही चर्चा केलेली नाही, असेही तानावडे यांनी सांगितले.

भाजप लोकसभा निवडणूक समितीच्या बैठकीत आगामी निवडणुकीवर विचारविनिमय काल करण्यात आला. भाजपच्या दक्षिण गोवा प्रचार कार्यालयाचे उद्घाटन मंगळवार दि. 13 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी 3.30 वाजता आणि उत्तर गोवा निवडणूक कार्यालयाचे उद्घाटन दि. 14 रोजी सकाळी 10 वाजता करण्यात येणार आहे, अशी माहिती तानावडे यांनी दिली.

लोकसभेची निवडणूक जवळ येत असल्याने भाजपने प्रचाराला गती देण्यास सुरुवात केली आहे. लोकसभा निवडणुकीचे गोवा प्रभारी आशिष सूद यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत निवडणूक प्रचाराच्या नियोजनावर विचारविनिमय झाला आहे, असेही तानावडे यांनी सांगितले.

भाजपचे लोकसभेच्या दोन्ही जागांसाठी उमेदवार अजूनपर्यंत जाहीर झालेले नाही. कमळ ही निशाणी घेऊन लोकसभा निवडणुकीचा प्रचार केला जात आहे. राज्य निवडणूक समितीकडे विचारार्थ आलेली इच्छुक उमेदवारांच्या नावांची यादी भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीकडे पाठविली जाणार आहे. केंद्रीय निवडणूक समितीकडून उमेदवारांचे नाव निश्चित केले जाणार आहे, असेही तानावडे यांनी सांगितले.