केवळ कार्यालयात बसू नका; धान्याची तपासणी देखील करा

0
7

>> मुख्यमंत्र्यांची नागरी पुरवठा खात्याच्या अधिकाऱ्यांना सूचना

राज्यातील नागरी पुरवठा खात्याच्या अधिकाऱ्यांनी केवळ कार्यालयात बसून काम करू नये, तर त्यांनी गोदामाला भेट देऊन रेशन धान्य दुकानदारांना पुरवल्या जाणाऱ्या धान्याची पाहणी देखील करावी, अशी सूचना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल पत्रकारांशी बोलताना केली. राज्यातील रेशनधान्य दुकानदारांना मिळालेला निकृष्ट दर्जाचा तांदुळ बदलून देण्याचा आदेश देण्यात आला आहे, असेही त्यांनी सांगितले.
राज्यातील मुरगाव, सांगे व इतर काही ठिकाणच्या रेशनधान्य दुकानदारांना निकृष्ट दर्जाचा तांदुळ देण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. यासंबंधीच्या प्रश्नावर बोलताना मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले की, नागरी पुरवठा खात्याला मिळालेल्या तांदळाच्या कोट्यापैकी काही तांदुळ नित्कृष्ट दर्जाचा असल्याची माहिती चौकशीत अहवालातून प्राप्त झाली आहे. नागरी पुरवठा खात्याच्या अधिकाऱ्यांनी रेशनधान्य वितरकांना दिल्या जाणाऱ्या धान्याची तपासणी करून वितरित करण्याची गरज आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
नागरी पुरवठा खात्याच्या निरीक्षकांचे लोकांना वितरित होणाऱ्या धान्याची तपासणीचे काम आहे. रेशनधान्याच्या तपासणीमध्ये निष्काळजी करणाऱ्या निरीक्षकांवर कारवाई करण्याचा इशारा रवी नाईक यांनी काल दिला.

कारवाईचा इशारा
नागरीपुरवठामंत्री रवी नाईक यांनी रेशनधान्याची तपासणी करून वितरण करण्याची सूचना संबंधितांना केली असून, रेशन धान्य तपासणीमध्ये हयगय करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईचा करण्याचा इशारा काल दिला.