देशाच्या तुलनेत राज्यात बेरोजगारीचे प्रमाण अधिक

0
16

>> सीएमआयईच्या आकडेवारीतून उघड

राष्ट्रीय स्तरावरील सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमीच्या (सीएमआयई) आकडेवारीनुसार गोव्याचा नोव्हेंबर २०२२ या महिन्याचा बेरोजगारीचा दर १३.६ टक्के एवढा आहे, तर देशातील बेरोजगारीचा राष्ट्रीय सरासरी दर ८.१ टक्का एवढा आहे.

गोव्यात ऑक्टोबरपासून पर्यटन हंगाम अधिकृतपणे सुरू झाला असून, राज्यात पर्यटकांची संख्या वाढली आहे. त्यामुळे रोजगाराच्या अधिक संधी अपेक्षित आहे, असे असतानाही गोव्यात बेरोजगारीची टक्केवारी जास्त असल्याचे सीएमआईच्या आकडेवारीतून समोर आले आहे.

नोव्हेंबर महिन्यातील २६ राज्यांतील बेरोजगारी दराची यादी जाहीर करण्यात आली असून, गोवा राज्य बेरोजगारीमध्ये देशात ८ व्या क्रमांकावर आहे. देशात मागील महिन्यात शहरी भागात बेरोजगारीचा दर ८.९६ टक्के आणि ग्रामीण भागात ७.५५ टक्के एवढा आहे. हरियाणाचा बेरोजगारी दर सर्वाधिक म्हणजे ३०.६ टक्के एवढाआहे.

राजस्थान २४.५ टक्के, जम्मू आणि काश्मीर २३.९ टक्के, बिहार १७.३ टक्के, आसाम १४ टक्के असा बेरोजगारी दर आहे. छत्तीसगड राज्यात सर्वांत कमी म्हणजे ०.१ टक्के आणि उत्तराखंड १.२ टक्के एवढी बेरोजगारी आहे.
दरम्यान, गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष, आमदार विजय सरदेसाई यांनी राज्यातील वाढत्या बेरोजगारीच्या प्रश्‍नावरून राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे.