पणजी-मडगाव मार्गावर वाहतूक कोंडीचा कहर

0
19

>> तीन तास प्रवासी अडकले वाहतूक कोंडीत; झुआरी पुलावरील किरकोळ अपघात ठरला निमित्त

पणजी-मडगाव महामार्गावरील झुआरी पुलावर काल सकाळी दोन वाहनांमध्ये झालेल्या अपघातामुळे कुठ्ठाळी येथे राष्ट्रीय महामार्गावर जवळपास तीन तास वाहतूक कोंडी झाली. या वाहतूक कोंडीमुळे प्रवाशांचे हाल झाले. काही प्रवाशांना दाबोळी विमानतळ गाठण्यास विलंब झाल्याने विमान चुकले. तसेच पणजी आणि अन्य भागांत सरकारी व खासगी कार्यालयांत जाणारे कर्मचारी रस्त्यातच अडकून पडले.

काल सकाळी आठच्या दरम्यान कुठ्ठाळी येथे झुआरी पुलावर एक पर्यटक टॅक्सी आणि टेम्पो ट्रॅव्हलर यांच्यात धडक बसली. त्यानंतर कुठ्ठाळी आणि आगशी या दोन्ही बाजूला प्रचंड वाहतूक कोंडी झाली. सकाळच्या वेळी कामावर जाण्यासाठी नागरिक बाहेर पडत असल्याने वाहतूक रहदारी जास्त असते. मात्र सदर अपघातामुळे कामाला जाणार्‍या नागरिकांना तासन्‌तास वाहतूक कोंडीत अडकून राहावे लागले. त्यामुळे सरकारी आणि खासगी कार्यालये व आस्थापनातील कर्मचार्‍यांना कामावर पोहोचण्यास बराच उशीर झाला.

पाऊण तासांच्या फरकानंतर झुआरी पुलावर अपघातात सापडलेली वाहने हलविली; मात्र तोपर्यंत पुलाच्या दोन्ही बाजूकडील वाहनांच्या रांगा वाढत गेल्या. ही वाहतूक कोंडी अडीच ते तीन तास कायम राहिली. काही प्रवाशांना दाबोळी विमानतळ गाठण्यास विलंब झाला. त्यामुळे प्रवाशांना विमान चुकले.
नव्या झुआरी पुलाच्या बांधकामामुळे वाहतूक कोंडी होते, ही बाब खरी असली, तरी वाहतूक पोलीस व वाहतूक खाते यांनी ती सोडवण्यासाठी काहीच प्रयत्न केले नसल्याचे आरोप आता होऊ लागले आहेत. सदर भागात सामान्य वाहतूक पोलीस व गृहरक्षकांच्या खांद्यावर ही जबाबदारी सोपवून वरिष्ठ अधिकारी कार्यालयात आराम करतात, असेच चित्र आहे.

आगशी बगलमार्गावरून विमानतळाकडे जाणार्‍या टॅक्सी या वाहतूक खोळंबलेली असतानाही तिसरी रांग करून पुढे जातात. त्यामुळे पुढे आणखी कोंडी होते. या सर्व समस्येवर मात करण्यासाठी या भागांत वाहतूक पोलीस व वाहतूक खात्याचे निरीक्षक तैनात करावेत, अशी मागणी लोक करत आहेत. काही महिन्यांपूर्वी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी या स्थितीची प्रत्यक्ष पाहणी केली होती आणि सूचना केल्या होत्या; पण नंतर त्याचा काही उपयोग झाला नाही.

प्रवाशांच्या सहनशक्तीचा होतोय अंत
पणजी-मडगाव मुख्य रस्त्यावर कुठ्ठाळी-आगशी दरम्यान वाहतूक कोंडी ही आता नित्याचीच बाब ठरू लागलेली असली, तरी गेले काही दिवस ती मोठ्या प्रमाणात होऊ लागली आहे. त्यामुळे या एक तासाच्या प्रवासाला आता अडीच ते तीन तास लागू लागले आहेत. त्यामुळे प्रवासी व वाहन चालकांच्या सहनशक्तीचा अंत होताना दिसत आहे.