गुजरातमध्ये पुन्हा एकदा भाजपच; हिमाचल प्रदेशमध्ये चुरस!

0
13

>> विविध मतदानोत्तर चाचण्यांतून अंदाज व्यक्त; गुजरातमध्ये भाजपला १३० जागांचा अंदाज; हिमाचलमध्ये भाजप-कॉंग्रेस पक्षामध्ये कडवी लढत

गुजरात विधानसभेच्या दुसर्‍या टप्प्यातील मतदान सोमवारी सायंकाळी ५ वाजता संपले आणि लगेचच विविध वृत्तवाहिन्या आणि संस्थांचे मतदानोत्तर चाचण्यांचे (एक्झिट पोल) कल धडकले. या मतदानोत्तर चाचण्यांतून गुजरातमध्ये भाजप पुन्हा एकदा सत्तेत येणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे, तर हिमाचलमध्ये भाजप आणि कॉंग्रेसमध्ये सत्तेसाठी चढाओढ लागणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. दोन्ही राज्यांच्या निवडणुकीचे निकाल ८ डिसेंबरला जाहीर होतील. त्यातून दोन्ही ठिकाणी भाजप पुनरागमन करणार की कॉंग्रेस आणि आम आदमी पक्ष विजयी होणार हे स्पष्ट होईल.

गुजरात विधानसभा निवडणुकीत पहिल्या टप्प्यात १ डिसेंबरला ८९ जागांसाठी ६३ टक्के मतदान झाले, तर दुसर्‍या टप्प्यात ५९ टक्के मतदान झाले. काल मतदानानंतर लगेचच मतदानोत्तर चाचण्यांचे कल जाहीर झाले. गुजरात विधानसभेची सदस्यसंख्या १८२ एवढी असून, बहुमताचा आकडा ९२ आहे.
टीव्ही ९ च्या एक्झिट पोलनुसार गुजरातमध्ये भाजपला १२५ ते १३०, कॉंग्रेसला ४० ते ५० आपला ३ ते ५ आणि इतरांना ३ ते ७ जागा मिळू शकतात. टाईम्स नाऊच्या एक्झिट पोलनुसार, गुजरातमध्ये भाजपला १३१, तर कॉंग्रेसला ४१ जागांवर यश मिळू शकते. आम आदमी पक्षाला ६ जागांवर यश मिळू शकेल. आज तक-ऍक्सिस माय इंडियाच्या एक्झिट पोलनुसार, गुजरातमध्ये भाजप १३१ ते १५१ जागा, कॉंग्रेसला १६ ते ३० जागा आणि आप ९ ते २१ जागांवर यश मिळवू शकतो. एबीपी न्यूज आणि सी व्होटरच्या एक्झिट पोलनुसार भाजपला १२८ ते १४०, कॉंग्रेसला ३१ ते ४३, आपला ३ ते ११ जागा मिळण्याचा अंदाज आहे.
हिमाचलमध्ये काय होणार?
हिमाचल प्रदेश विधानसभेच्या ६८ जागांसाठी ४१२ उमेदवार रिंगणात होते आणि या निवडणुकीसाठी १२ नोव्हेंबर रोजी एकाच टप्प्यात ७५.६ टक्के मतदान झाले होते. हिमाचल विधानसभेची सदस्यसंख्या ६८ असून, बहुमताचा आकडा ३५ आहे.

आज तक आणि एक्सिस माय इंडियाच्या एक्झिट पोलनुसार हिमाचलप्रदेशमध्ये भाजपला २४ ते ३४ आणि कॉंग्रेसला ३० ते ४० जागा मिळत असल्याचे दिसत आहे. आम आदमी पक्षाचा सुपडासाफ होण्याची चिन्ह आहेत. याशिवाय ४ ते ८ जागांवर अपक्ष उमेदवार निवडून येणार असल्याचा अंदाज आहे. एबीपी न्यूज आणि सी व्होटरच्या एक्झिट पोलनुसार ३३ ते ४१ जागा यंदा भाजप जिंकेल असा अंदाज आहे. कॉंग्रेसच्या जागा यंदा वाढताना दिसत आहेत. कॉंग्रेसला गेल्या वेळी २१ जागा मिळाल्या होत्या. यंदा कॉंग्रेस २४ ते ३२ पर्यंत जागा जिंकू शकतो, असा अंदाज आहे.