पुरातन कातळशिल्पांची तज्ज्ञांकडून तपासणी सुरू : राज्य सरकार

0
13

सांगे तालुक्यातील पणसुले येथील पुरातन कातळशिल्पांची तज्ज्ञांकडून तपासणी करून घेतली जात आहे, अशी माहिती ऍडव्होकेट जनरल देविदास पांगम यांनी काल राज्य सरकारच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाला दिली.

पणसुले-सांगे येथील कातळशिल्पासंबंधींची एक याचिका न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवरील सुनावणीच्या वेळी ही माहिती देण्यात आली. पणसुले येथील पुरातन कातळशिल्पांचा अभ्यास करून सल्ला देण्यासाठी तीन तज्ज्ञ शास्त्रज्ञांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यातील एका तज्ज्ञ शास्त्रज्ञाने सदर या पुरातन जागेची पाहणी केली असून, त्याचा अहवाल दोन आठवड्यात मिळणार आहे. तसेच, आणखी दोन तज्ज्ञ शास्त्रज्ञ या महिन्यात या पुरातन स्थळाला भेट देऊन अभ्यासाअंती अहवाल सादर करणार आहेत. या पुरातन कातळशिल्पांची सुरक्षा आणि संवर्धनासंबंधी सल्ला घेतला जात आहे, असेही ऍड. पागम यांनी सांगितले.

या कातळशिल्पांबाबत अहवाल सादर करण्यासाठी अवधी द्यावा, अशी विनंती सरकारतर्फे करण्यात आली आहे. न्यायालयाने २० जानेवारीपर्यंत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. या प्रकरणी सुनावणी २४ जानेवारीपर्यंत तहकूब करण्यात आली आहे.