>> माजी पंतप्रधान राजीव गांधी हत्याकांड
माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येप्रकरणातील सहा दोषींची सुटका करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने ११ नोव्हेंबर रोजी दिले होते. या निर्णयाविरोधात काही दिवसांपूर्वीच केंद्र सरकारकडून सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आली होती. केंद्र सरकारनंतर आता कॉंग्रेस पक्षही या दोषींच्या सुटकेविरोधात पुनर्विचार याचिका दाखल करणार असल्याची माहिती कॉंग्रेस नेते अभिषेक मनु सिंघवी यांनी काल दिली.
राजीव गांधी हत्या प्रकरणातील दोषींची सुटका करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. त्यानंतर त्या सर्वांची कारागृहातून सुटका करण्यात आली आहे. या प्रकरणी आम्ही पुनर्विचार याचिका दाखल करणार आहोत; मात्र ही याचिका केंद्र सरकारच्या याचिकेबरोबर करायची की वेगळी दाखल करायची याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही, अशी माहिती अभिषेक मनु सिंघवी यांनी दिली. दरम्यान, या निर्णयाविरोधात १७ नोव्हेंबर रोजी केंद्र सरकारकडून पुर्नविचार याचिका दाखल करण्यात आली होती.