स्वातंत्र्यसैनिकांच्या मुलांना नोकर्‍या द्या; अन्यथा आंदोलन : वीरेश बोरकर

0
15

राज्य सरकारने राज्यातील स्वातंत्र्यसैनिकांच्या मुलांना नोकर्‍या देण्याच्या आश्‍वासनाची पूर्तता त्वरित करावी; अन्यथा स्वातंत्र्यसैनिकांच्या मुलांसोबत आंदोलन करण्याचा इशारा रिव्होल्युशनरी गोवन्स पक्षाचे आमदार वीरेश बोरकर यांनी काल पत्रकार परिषदेत दिला. दरम्यान, आमदार बोरकर यांच्यासमवेत स्वातंत्र्यसैनिकांच्या मुलांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत १९ डिसेंबरपर्यंत नोकर्‍या न दिल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा काल दिला.

आरजी पक्ष स्वातंत्र्यसैनिकांच्या मुलांच्या नोकरीचा प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार आहे. राज्य सरकारने स्वातंत्र्यसैनिकांच्या मुलांना सरकारी नोकर्‍या देण्याचे आश्‍वासन दिलेले आहे. राज्यात स्वातंत्र्यसैनिकांच्या मुलांना नोकर्‍यांत २ टक्के आरक्षण जाहीर केले आहे. तथापि, नोकरभरती करताना त्यांना डावलले जात आहे. सरकारने या आश्‍वासनाचे पालन केले पाहिजे. स्वातंत्र्यसैनिकांच्या मुलांचे वय वाढत चालले आहे. त्यामुळे वेळीच नोकर्‍या न दिल्यास नोकर्‍यांपासून वंचित राहू शकतात. स्वातंत्र्यसैनिकांच्या ५५ वर्षे पूर्ण केलेल्या मुलांच्या नोकरीच्या प्रश्‍नावर त्वरित तोडगा काढण्याची गरज आहे, असेही बोरकर यांनी सांगितले.

मागील दोन वर्षांपासून राज्य सरकारकडे स्वातंत्र्यसैनिकांच्या मुलांच्या नोकरीचा प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा केला जात आहे. हा नोकरीचा प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी आझाद मैदानावर उपोषण आंदोलन सुध्दा केलेले आहे, तरी सुध्दा सरकारकडून नोकरीच्या आश्‍वासनाची पूर्तता करण्याकडे लक्ष दिले जात नाही, असे नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्या मुलांनी सांगितले.