गोवा राज्य सहकारी बँकेला तब्बल २.५१ लाखांचा दंड

0
20

>> रिझर्व्ह बँकेची एकूण आठ बँकांवर कारवाई

भारतीय रिझर्व्ह बँकने आठ भारतीय बँकांना आर्थिक दंड ठोठावला आहे. या यादीत गोव्यातील गोवा राज्य सहकारी बँकेचा देखील समावेश आहे. बँकिंग नियमन कायद्यातील तरतुदींचे पालन न केल्याचा ठपका गोवा राज्य सहकारी बँकेवर ठेवण्यात आला असून, बँकेला तब्बल २.५१ लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. आठही बँकांना १ लाख ते ४० लाखांपर्यंत आर्थिक दंड ठोठावला असून, दंडाची एकत्रित रक्कम २.३३ कोटी एवढी आहे.

या कारवाईत गुजरातच्या मेहसाणा अर्बन को-ऑपरेटिव्हे बँकेवर ४० लाख रुपयांचा सर्वात जास्त दंड आकारण्यात आला असून, इतर बँकांना १ ते ४० लाख रुपयांपर्यंत दंड ठोठावण्यात आला आहे. आरबीआयने आर्थिक दंड ठोठावलेल्या बँकांच्या यादीत महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश आहे. इंदापूर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक, द यवतमाळ अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लि., वरुड अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लि. या तीन बँकावर दंडात्मक कारवाई केली आहे. केवायसी निर्देशांचे पालन करण्यात अयशस्वी झाल्याबद्दल द यवतमाळ अर्बन बँकेला ३.५० लाख रुपयांचा, तर वरुड अर्बन बँकेला १ लाखाचा, इंदापूर अर्बन बँकेला ७ लाखांचा दंड ठोठावला आहे. याशिवाय, काही केवायसी तरतुदींचे पालन न केल्याबद्दल छत्तीसगड राज्य सहकारी बँकेला २५ लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. दरम्यान, रिझर्व्ह बँकेने नियमांच्या उल्लंघनाबाबत ही कारवाई केली असून, त्याचा ग्राहकांवर मात्र कोणताही परिणाम होणार नाही.

भारतीय रिझर्व्ह बँकेने दंड ठोठावलेल्या बँका : १. गोवा राज्य सहकारी बँक, २ छत्तीसगड राज्य सहकारी बँक, ३. गराहा सहकारी बँक, ४. द यवतमाळ अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक, ५. जिल्हा सहकारी केंद्रीय बँक,छिंदवाडा, ६. वरुड. अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक, ७. इंदापूर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक, ८. मेहसाणा अर्बन सहकारी बँक.