पीओपीच्या गणेशमूर्ती आणणारी वाहने राज्याच्या सीमेवरच रोखा

0
20

>> राज्य सरकारचे अधिकार्‍यांना आदेश

परराज्यातून गोव्यात येणार्‍या प्लास्टर ऑफ पॅरिस (पीओपी)च्या गणेशमूर्तींवर राज्य सरकारने बंदी घातली असून, अशा मूर्ती घेऊन राज्यात प्रवेश करू पाहणार्‍या परराज्यातील वाहनांवर लक्ष ठेवावे आणि तपासणी नाक्यांवरच ही वाहने अडवावीत, असा आदेश काल गोवा सरकारने संबंधित अधिकार्‍यांना दिला.

अबकारी खात्याने पर्यावरणासाठी घातक असलेल्या पीओपीच्या मूर्तींवर बंदी घातलेली असून, संबंधित तालुक्यांतील तपासणी नाक्यांवरील अधिकार्‍यांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. गणेशचतुर्थीच्या सणाला दरवर्षी परराज्यांतून गोव्यात पीओपीच्या मूर्ती आणल्या जातात; मात्र गेल्या काही वर्षांपासून राज्य सरकारने या मूर्तींवर बंदी घातली असल्याने काही वेळा कुणालाही थांगपत्ता न लागू देता या मूर्ती गोव्यात आणल्या जातात. या पार्श्‍वभूमीवर राज्य सरकारने शेजारच्या राज्यांतून गोव्यात आणल्या जाणार्‍या या पीओपीच्या मूर्तींच्या वाहतुकीवर लक्ष ठेवावे व त्या घेऊन येणारी वाहने एक तर परत पाठवावीत किंवा जवळपासच्या पोलीस चेक पोस्टच्या स्वाधीन करावीत, असे अबकारी आयुक्त नारायण गाड यांनी स्पष्ट केले आहे.