कोरोनाच्या जागतिक प्रकोपामधून जग अजूनही सावरले नसताना मंकीपॉक्सच्या वाढत्या रुग्णांनी जगाला चिंतित करणे साहजिक आहे. आतापावेतो नाही नाही म्हणता ७५ देशांतून मंकीपॉक्सचे सोळा हजार रुग्ण आढळून आले आहेत आणि भारतामध्ये केरळमध्ये तीन, दिल्लीमध्ये एक आणि काल पाटण्यामध्ये एक संशयित रुग्ण आढळल्याने हे लोण आता येथेही वाढत चाललेले दिसते आहे. एकच दिलासादायक बाब म्हणजे हा रोग तसा प्राणघातक नाही. अगदीच अल्प रोगप्रतिकारशक्ती असलेल्या रुग्णांच्या जिवाला अपाय संभवत असला तरी साधारणतः वेळीच उपचारांनी हा संसर्ग काही आठवड्यांत बरा होतो असे सध्या तरी दिसते. कांजिण्यांसदृश्य संपूर्ण शरीरावर फोड येत असल्याने एकेकाळी आपल्याकडे धुमाकूळ घालणार्या देवी रोगाचे स्मरण होणेही साहजिक आहे. परंतु ज्या प्रकारे देवीचे उच्चाटन करण्यात यश मिळाले, तशाच प्रकारे मंकीपॉक्सचे उच्चाटनही निश्चितपणे होईल. मात्र, त्यासाठी योग्य लस पुरेशा प्रमाणावर उपलब्ध होण्यास थोडा काळ जावा लागणार असल्याने तोवर ह्या रोगाचा संसर्ग कमीत कमी व्हावा असा प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे.
जागतिक आरोग्य संघटनेने गेल्या आठवड्यात मंकीपॉक्स ही सार्वजनिक आरोग्यक्षेत्रासाठी आणीबाणी घोषित केली होती. त्यानंतर भारत सरकारने राज्यांना सतर्कतेचे निर्देश दिले आणि काल गोवा सरकारनेही मंकीपॉक्सच्या संदर्भात आपण सज्ज असल्याचे स्पष्ट केले आहे.
भारतामध्ये आतापर्यंत मंकीपॉक्सचे जे चार अधिकृत रुग्ण सापडले आहेत, त्यापैकी तिघे केरळमध्ये संयुक्त अरब अमिरातीतून आलेले होते. दिल्लीत सापडलेल्या चौथ्याने जरी विदेश प्रवास केलेला नसला तरी तो हिमाचल प्रदेशमध्ये एका बॅचलर पार्टीला जाऊन आला होता. मंकीपॉक्सचा संसर्ग सुरवातीला प्राण्यांपासून मानवाला होत असल्याचे दिसून आले होते. मात्र आता मानवापासून मानवाला संसर्ग दिसू लागला आहे. प्रारंभी हा केवळ लैंगिक संबंधांतून पसरतो अशी समजूत होती, परंतु आता मानवी स्त्रावांद्वारेही त्याचा संसर्ग होऊ शकतो अशी अटकळ व्यक्त होते आहे. यावर अजून अभ्यास चाललेला आहे, परंतु अशा प्रकारचा एखादा विषाणू जेव्हा मानवी शरीरात प्रवेश करतो तेव्हा तो सतत स्वतःमध्ये बदल घडवत उत्क्रांत होत जात असतो. त्यामुळेच या मंकीपॉक्स विषाणूवर जास्तीत जास्त निर्बंध घालण्यासाठी आणि त्याचा व्यापक संसर्ग टाळण्यासाठी रुग्णांचे वेळीच विलगीकरण गरजेचे आहे. तूर्त विदेशांतून भारतात येणार्या प्रवाशांची देखरेख आणि गरज भासल्यास विलगीकरण यावर त्यामुळे भर द्यावा लागणार आहे. काही बेफिकीर माणसे या निर्बंधांतून पळवाटा काढतात आणि मग संसर्ग महामारीचे रूप घेतो हे कोरोनावेळी दिसून आले होते. अद्याप तरी मंकीपॉक्सचा संसर्ग कोरोनाप्रमाणे व्यापक नसल्याने भीती बाळगण्याचे कारण नाही, परंतु तरीही खबरदारीच्या उपाययोजना करणे केव्हाही श्रेयस्कर ठरेल.
सध्या गोव्यामध्ये लहान मुलांमध्ये अंगावर पुरळ उठवणार्या हँड फूट अँड माऊथ आजाराचे प्रमाण वाढलेले दिसते. त्याचा मंकीपॉक्सशी काहीही संबंध नाही, त्यामुळे पालकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही. जगभरात ज्यांना खरोखरच मंकीपॉक्स संसर्ग झाला आहे, त्यांच्या अंगावरील व्रण दोन ते चार आठवडे वेदनादायक ठरत असले तरी नंतर ते जातात असे आढळून आले आहे. शिवाय हा विषाणू खरे तर तसा नवा नाही. गेली पन्नास वर्षे तो जगामध्ये अस्तित्वात होता. काही देशांसाठी मात्र तो नवा असल्याने सध्याचे भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे. त्यावर लस उपलब्ध आहे आणि तिचे व्यापक उत्पादन करण्याचे प्रयत्नही सुरू झालेले आहेत. त्यामुळे मंकीपॉक्सवरही मानव निश्चित मात करील. फक्त गरज आहे ती सरकारी यंत्रणा आणि जनतेने तोवर योग्य खबरदारी घेण्याची.
गेल्या काही वर्षांत असे अनेक नवनव्या रोगांचे उद्रेक झाले. कोरोनाने महामारीचे स्वरूप धारण केले, परंतु सार्स, स्वाईन फ्लू, बर्डफ्लू अशा अनेक गोष्टींनी त्या त्या वेळी असेच भीतीचे वातावरण निर्माण केले होते व त्यावर यशस्वीरीत्या उपचार करण्यात मानवाला यश आले. मंकीपॉक्सचा संसर्गाचा वेग अद्याप तरी कोरोनाच्या तुलनेत खूप कमी आहे. आढळलेल्या रुग्णावर वेळीच उपचार सुरू करून त्याच्यापासून संसर्ग रोखणेही शक्य आहे. त्यामुळे त्यावर नियंत्रण आणणे तेवढे अशक्य नसेल अशी आशा आहे. मंकीपॉक्सची लक्षणे विद्रुप करणारी असल्याने तो लपवण्याकडे कल असला तर मात्र ते घातक ठरेल याची जाणीव ठेवणे हितावह ठरेल. मानवी जीवनावर आजवर अनेक संकटे आली नि गेली. मानवजात मात्र पुढेच जात राहिली आहे आणि राहील!