५७२३ उमेदवारी अर्ज वैध

0
15

>> आज होणार अंतिम चित्र स्पष्ट

>> १४ अर्ज बाद; आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा दिवस

१० ऑगस्टला होणार्‍या राज्यातील १८६ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी सादर झालेल्या ६२५६ उमेदवारी अर्जांची काल छाननी करण्यात आली. त्यात १४ अर्ज बाद ठरवण्यात आले, तर ५७२३ अर्ज वैध ठरले. काहींनी एकापेक्षा जास्त अर्ज दाखल केले होते, ते अर्ज छाननीनंतर साहजिकच बाद ठरले. बुधवार दि. २७ जुलै हा अर्ज मागे घेण्याचा दिवस असून, किती उमेदवार आपले अर्ज मागे घेतात, त्यानंतरच पंचायत निवडणुकांचे अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे.

पेडणे तालुक्यातील १७ पंचायतींसाठी दाखल अर्जांपैकी केवळ १ अर्ज फेटाळण्यात आलेला असून, ४८९ अर्ज वैध ठरले आहेत. डिचोली तालुक्यातील एकूण १७ पंचायतींसाठी दाखल अर्जांपैकी १ अर्ज फेटाळण्यात आला असून, ४५२ अर्ज वैध ठरवण्यात आले आहेत.

सत्तरी तालुक्यातील १२ पंचायतींसाठीचे ३३३ अर्ज वैध ठरवण्यात आले असून, २ अर्ज फेटाळण्यात आले आहेत. बार्देश तालुक्यातील ३३ पंचायतींसाठीचे ११४२ अर्ज वैध ठरवण्यात आले असून, ५ अर्ज फेटाळण्यात आले आहेत.
तिसवाडी तालुक्यातील १८ पंचायतींसाठीचे ६४३ अर्ज वैध ठरले आहेत, तर १ अर्ज बाद करण्यात आला आहे. फोंडा तालुक्यातील १९ पंचायतींसाठीचे ६६० अर्ज वैध ठरवण्यात आले, तर ३ अर्ज बाद ठरवण्यात आले. धारबांदोडा तालुक्यातील ५ पंचायतींसाठीचे १४३ अर्ज वैध ठरवण्यात आले असून, एकही अर्ज फेटाळण्यात आलेला नाही. तसेच सांगे तालुक्यातील ७ पंचायतींतील १९१ अर्ज वैध ठरले असून, एकही अर्ज फेटाळण्यात आलेला नाही.

३० उमेदवारांची बिनविरोध निवड
उमेदवारी अर्जांच्या छाननीनंतर काल ३० उमेदवार बिनविरोध निवडून आल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे या उमेदवारांना प्रचारापासून सुटका मिळणार आहे. केपे तालुक्यातील १, पेडणे तालुक्यातील २, तिसवाडीतील ३, सत्तरीतील ६, डिचोली ५, काणकोणतील १, बार्देशमधील ३ आणि सासष्टीतील ९ उमेदवार बिनविरोध निवडून आले.

मतदानादिवशी भरपगारी सुट्टी जाहीर
पुढील महिन्यात १० ऑगस्ट रोजी पंचायत निवडणुकांसाठी मतदान होणार असल्याने राज्य सरकारने त्या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. सदर दिवशी राज्यातील १८६ पंचायतींच्या निवडणुका होणार आहेत. पंचायत क्षेत्रातील मतदार असलेले औद्योगिक कामगार, सरकारी खात्यांतील रोजंदारीवरील कामगार, रोजंदारीवरील औद्योगिक कामगार, सर्व खासगी आस्थापने, अन्य छोटे-मोठे उद्योग व व्यापार यात काम करणारे कामगार व कर्मचारी या सर्वांना भरपगारी सुट्टी असेल, असे सरकारने एका आदेशाद्वारे स्पष्ट केले आहे.

सासष्टी तालुक्यातील ३३ पंचायतींतील ९३८ अर्ज वैध ठरवण्यात आले असून, एक अर्ज बाद करण्यात आला आहे. मुरगाव तालुक्यातील ७ पंचायतींतील २४८ अर्ज वैध ठरवण्यात आले असून, एकही अर्ज फेटाळण्यात आलेला नाही. केपे तालुक्यातील ११ पंचायतींसाठीचे सर्व २८३ अर्ज वैध ठरले आहेत. काणकोण तालुक्यातील ७ पंचायतींसाठीचे सर्वच्या सर्व २०१ अर्ज वैध ठरले आहेत. छाननीनंतर ५७२३ उमेदवारी अर्ज वैध ठरले असून, बुधवार हा अर्ज मागे घेण्याचा दिवस आहे. त्यानंतरच निवडणुकांचे अंतिम चित्र समोर येणार आहे.