‘अग्निपथ’ भरतीसाठी दोन दिवसांत अधिसूचना

0
12

>> तिन्ही दलांच्या प्रमुखांची पत्रकार परिषदेत माहिती

केंद्र सरकारच्या अग्निपथ योजनेबाबत मोठा गदारोळ सुरू असतानाच काल रविवारी झालेल्या पत्रकार परिषदेत तिन्ही दलांच्या प्रमुखांनी विरोधाला न जुमानता सरकार दोन दिवसांत अग्निपथ योजनेंतर्गत भरतीसाठी अधिसूचना जारी करणार असल्याचे म्हटले आहे. विद्यार्थ्यांच्या विरोधानंतर सरकारने भारतीय सैन्यदलाचे भवितव्य डोळ्यासमोर ठेवून या योजनेत विविध बदल केले आहेत.

रविवारी तिन्ही लष्करांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत लष्कर, नौदल आणि हवाई दलातील भरती प्रक्रियेबाबतही माहिती देण्यात आली आहे. लष्कर प्रमुख मनोज पांडे यांनी, अग्निवीरांची पहिली टीम डिसेंबर २०२२ पर्यंत आमच्या रेजिमेंटल केंद्रांमध्ये सामील होणार असून त्यांना पुढील वर्षाच्या मध्यापर्यंत तैनातीसाठी उपलब्ध करून दिले जाईल असे सांगितले. यावेळी २४ जूनपासून भरती प्रक्रिया सुरू होणार असल्याची माहिती लेफ्टनंट जनरल अनिल पुरी, एअर मार्शल एसके झा यांनी दिली. अग्निवीरांचे प्रशिक्षण ३० डिसेंबरपासून सुरू होणार आहे. तसेच नौदलातील अग्निवीरांसाठी २५ जून रोजी जाहिरात येईल व नौदलात अग्निवीरांची भरती प्रक्रिया महिनाभरात सुरू होणार आहे. भारतीय सैन्यात अग्निवीरांच्या भरतीसाठी १ जुलै रोजी अधिसूचना जारी केली जाईल.

रेल्वेची ५०० कोटींची हानी
अग्निपथ योजनेच्या विरोधात देशभरात सुरू असलेल्या आंदोलनात रेल्वे मालमत्तेचे ५०० कोटीहून अधिक रुपयांचे नुकसान झाले असल्याची माहिती रेल्वेच्या सूत्रांनी दिली. अग्निपथ योजनेविरोधात देशभरातील रेल्वे गाड्यांना लागलेल्या आगीमुळे जवळपास १०० डब्यांचे नुकसान झाले आहे.

३५ वॉट्‌स ऍप ग्रुपवर बंदी
अग्निपथ या योजनेविरोधात हिंसा भडकवली जात असून अफवा पसरवल्या जात आहेत. याची दखल घेत ३५ वॉट्‌स ऍप ग्रुपवर केंद्रीय गृहमंत्रालयाने बंदी घातली आहे.

हिंसाचारात सहभागी नसल्याचे प्रमाणपत्र द्यावे
केंद्र सरकारने जाहीर केलेली अग्निवीर भरती प्रक्रिया तातडीने सुरू होणार असून त्यासाठी प्रत्येक युवकाला भरतीआधी हिंसा, तोडफोडीत सहभागी नसल्याचे प्रमाणपत्र द्यावे लागणार असल्याची माहिती लष्कराच्या वतीने देण्यात आली. पोलीस व्हेरिफिकेशन हे शंभर टक्के करावे लागणार आहे. ते असल्याशिवाय अग्निवीरांना सेवा जॉईन करता येणार नाही, असे यावेळी लेफ्टनंट जनरल अनिल पुरी यांनी सांगितले.