इफ्फी घोटाळाप्रकरणी गुन्ह नोंदवून तपास करण्याचे आदेश

0
9

आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फी) २०१४ मधील कथित घोटाळा प्रकरणी गुन्हा नोंदवून तपास करण्याचे निर्देश येथील प्रथम श्रेणी न्यायालयाने पणजी पोलिसांना दिले आहेत.
गोवा फॉरवर्ड पक्षाचे उपाध्यक्ष तथा तक्रारदार दुर्गादास कामत यांनी न्यायालयाच्या निवाड्याचे स्वागत केले असून या इफ्फीतील अंदाजे पाच कोटी रुपयांच्या कथित घोटाळा प्रकरणी सखोल चौकशी करून सत्य जनतेसमोर आणावे, अशी मागणी केली आहे.
इफ्फी २०१४ मधील कथित घोटाळ्याचे प्रकरण बरेच गाजले होते. या इफ्फीच्या आयोजनाच्या वेळी चार लघुनिविदा तसेच इतर माध्यमांतून सुमारे पाच कोटी रुपयांचा घोटाळा करण्यात आल्याचा आरोप दुर्गादास कामत यांनी करून पणजी पोलीस स्थानकावर तक्रार नोंद केली होती. महालेखापालांच्या अहवालातही इफ्फी २०१४ मधील व्यवहाराबाबत प्रश्‍न उपस्थित करण्यात आला होता, असे कामत यांनी पत्रकार परिषदेत बोलताना काल सांगितले.
पोलिसांकडून या गैरव्यवहार प्रकरणाच्या तक्रारीची योग्य दखल घेतली जात नसल्याने येथील प्रथम श्रेणी न्यायालयात अर्ज दाखल करून इफ्फीच्या कथित गैरव्यवहार प्रकरणी चौकशीची मागणी करण्यात आली होती. न्यायालयाने या तक्रारीच्या तपास कामाची माहिती प्रत्येक महिन्याला सादर करण्याची सूचना केली आहे.