अग्निशामक दलाच्या जवानांनी वेळीच घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली. आग इतरत्र पसरली असती तर दुर्घटने आणखी मोठी हानी होण्याची शक्यता होती.
पेट्रोल पंपवरील कर्मचार्यांनी दिलेल्या माहितीनुसार ही दुर्घटना काल दुपारी १२.३० च्या सुमारास घडली. जीए ०१ झेड २९९७ या टँकरमधून पेट्रोल पंपच्या टाक्यात पेट्रोल भरण्यात येत होते. यावेळी आवश्यक खबरदारी व्यवस्थापनाने घेतली होती. टँकरमधील पेट्रोल खाली करीत असताना टँकरचा चालक, वाहक तसेच पंपचे व्यवस्थापक टँकरजवळ होते.
यावेळी अचानक टाक्यांच्या तोंडावर असलेल्या सिस्टमधून स्पार्क आला व पेट्रोलच्या पाइपने पेट घेतला. आग पाहून तिघेजण घाबरले व जीव वाचविण्यासाठी कार्यालयाच्या बाजूने निसटले.
व्यवस्थापकांनी हा प्रकार पाहून पोलीस तसेच अग्निशामक दलाला आगीची खबर दिली व मालकांनाही कळवले.
आगीची माहिती मिळताच येथील अग्निशामक दलाचे प्रमुख दत्ताराम रेडकर व त्यांचे साथी पाण्याचे दोन बंब घेऊन त्वरित घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आग विझविण्यास सुरूवात केल्यानंतर या प्रकाराची माहिती पणजी, डिचोली व पेडणे येथील अग्निशामक दलांनाही देण्यात आली. त्यानुसार म्हापसा येथील दोन, पेडणे येथील दोन, पणजी येथील तीन व डिचोली येथील एक मिळून आठ बंबांनी सुमारे दीड ते दोन तास झुंज देत आग विझवली.
अग्निशामक दलाचे प्रमुख अशोक मेनन यांच्या मार्गदर्शनाखाली बॉस्को फेर्राव, हेमंत चोडणकर, श्री. परवार, तुकाराम देसाई, लक्ष्मण नाईक, तुकाराम देसाई, दत्ताराम रेडकर या अधिकार्यांनी आपल्या सहकारी जवानांच्या मदतीने आग विझविली.
दरम्यान, घटनेबाबत समजताच पोलीस उपअधीक्षक निळू राऊत देसाई, निरीक्षक भानुदास देसाई व त्यांच्या सहकार्यांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतली व पेट्रोल पंप परिसराजवळ संरक्षणकडे उभे करून वाहन वाहतूक रोखून धरली.
करासवाडा येथे असलेल्या रॉबर्टवरील पोलिसांना धुळेर चॅपेलजवळ धुळेरकडे येणारी वाहनेही अडविली. म्हापशाकडून धुळेरकडे जाणारी वाहने कोर्ट इमारतीकडे थांबविण्यात आली. शिवोलीकडून येणारी वाहतूक धुळेर सरकारी प्राथमिक शाळेजवळ रोखण्यात आली. निवडणुकीच्या कामासाठी गोव्यात आलेल्या पंजाब पोलिसांनाही मदतीसाठी पाचारण करण्यात आले. त्यांनी लोकांच्या गर्दीवर नियंत्रण ठेवले. आगीची खबर मिळताच हजारो लोकांनी घटनास्थळी धाव घेतली होती. उपजिल्हाधिकारी जयंत तारी, मामलेदार ब्रिजेश मणेरकर, पालिका मुख्याधिकारी नारायण गाड, नगराध्यक्ष आशिष शिरोडकर, नगरसेवक ऍड. सुभाष नार्वेकर, दीपक म्हाडेश्री यांनी अग्निशामक दलाचे प्रमुख दत्तराम रेडकर व आग विझविणार्या जवानांची प्रशंसा केली. दत्तप्रसाद भांगले यांच्या मालकीचा हा पंप एडवीन गोम्स नावाच्या इसमाकडे चालविण्यासाठी कंत्राटाने पंधरा दिवसांपूर्वी देण्यात आला होता. पंपाच्या कार्यालयाच्या उजव्या बाजूला गॅसवर चालणार्या गाड्यांत गॅस भरण्याचीही टाकी आहे. अग्निशामक दलाच्या जवानांनी आग इतरत्र पसरायला न दिल्याने पंपवरील इतर यंत्रणा वाचली.