कपिलेश्वरी-ढवळी येथे मलनिस्सारण एसटीपी प्रकल्पाचे काम सुरू असताना खोदलेल्या चेंबरमधील पाण्यात बुडूनच एका कामगाराचा मृत्यू झाला. ही घटना काल संध्याकाळी घडली.
फोंडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कपिलेश्वरी-ढवळी येथील दाग परिसरात मलनिस्सारण प्रकल्पाचे काम सुरू आहे. या ठिकाणी मलनिस्सारणाच्या वाहिन्या व चेंबर बांधण्यासाठी खोदकाम सुरू आहे. हे काम जवळपास पूर्ण झाले असून आता फक्त जोडणी तेवढी बाकी आहे.
एसटीपीच्या चेंबरमध्ये दोन कामगार उतरले होते. मात्र अचानकपणे या त्यात पाणी भरू लागले. त्यामुळे एका कामगाराने कसेबसे चेंबरबाहेर येऊन आपला जीव वाचवला, पण अन्य दुसरा कामगार शुभम गोपडे (वय २१) हा या पाण्यात बुडाला. अचानकपणे पाणी भरल्याने शुभमला या चेंबरच्या बाहेर पडणे कठीण झाले. त्यामुळे त्याचे बुडून निधन झाले. शुभम गोपडे हा परप्रांतीय असून, तो सध्या फोंड्यात राहत होता. या घटनेनंतर त्याला फोंड्यातील आयडी उपजिल्हा इस्पितळात उपचारासाठी नेण्यात आले, मात्र तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.