सरकारी नोकरभरतीसाठी एक वर्षाची मुदत

0
17

>> कायदा दुरुस्तीसाठी अध्यादेश जारी

राज्य सरकारच्या ज्या खात्यांनी पदांच्या भरतीसाठी ८ जानेवारी २०२२ पूर्वी जाहिराती जारी केल्या आहेत, त्या खात्यांना सदर पदांच्या भरतीसाठी परीक्षा घेण्याबाबत आणि पदांसाठीची निवड प्रक्रिया एका वर्षाच्या आत पूर्ण करण्याविषयी सूचना करण्यात आली आहे.

राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांनी गोवा कर्मचारी निवड आयोग (सुधारणा) अध्यादेश – २०२२ बुधवार ११ मे २०२२ रोजी जारी केला आणि काल तो अधिसूचित करण्यात आला. गोवा कर्मचारी भरती आयोग कायदा २०१९ मध्ये अध्यादेशाद्वारे दुरुस्ती करण्यात आली आहे. सरकारी कर्मचारी नोकरभरतीबाबत त्वरित निर्णय घेण्यासाठी अध्यादेश जारी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य सरकारच्या विविध खात्यांनी पदांच्या भरतीसाठी राज्य विधानसभा निवडणूक आचारसंहितेपूर्वी मोठ्या प्रमाणात जाहिरात प्रसिद्ध केल्या होत्या. या नोकरभरतीची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली. त्यामुळे सरकारी पातळीवरील नोकरभरती रखडली. राज्यपालांनी गोवा कर्मचारी भरती दुरुस्ती अध्यादेश जारी केल्याने आता या पदांच्या भरती प्रक्रियेला गती मिळणार आहे. संबंधित खात्यांना उमेदवारांच्या परीक्षा घेऊन निवडीसाठी एक वर्षाचा कालावधी देण्यात आला आहे.