५७ जागांसाठी १० जूनला निवडणूक

0
17

>> राज्यसभेसाठी निवडणूक आयोगाकडून वेळापत्रक जाहीर

राज्यसभेच्या रिक्त होत असलेल्या ५७ जागांची निवडणूक जाहीर झाली असून, भारतीय निवडणूक आयोगाने काल या निवडणुकीचे सविस्तर वेळापत्रक जाहीर केले. त्यानुसार १० जून रोजी या ५७ जागांसाठी मतदान होणार आहे. निवडणूक होत असलेल्या ५७ राज्यसभा खासदारांची मुदत २१ जून ते १ ऑगस्ट या काळात संपत आहे. त्यात १५ राज्यांमधील ५७ खासदारांचा समावेश आहे.
राज्यसभेच्या ५७ जागा या १५ राज्यांमधील आहेत. महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, तामिळनाडू, आंध्रप्रदेश, तेलंगाणा, छत्तीसगड, पंजाब, मध्यप्रदेश, कर्नाटक, ओडिशा, राजस्थान, उत्तराखंड, बिहार, झारखंड आणि हरियाणा राज्यांतील जागांचा त्यामध्ये समावेश आहे.

२४ मे रोजी ५७ जागांसाठी निवडणुकीची अधिसूचना जारी करण्यात येणार आहे. तसेच, यासाठी नामांकनाची अंतिम तारीख ३१ मे असणार आहे. नामांकन छाननीची तारीख १ जून आणि नावे मागे घेण्याची अंतिम तारीख ३ जून असणार आहे. सर्व ५७ जागांसाठी १० जून रोजी सकाळी ९ ते दुपारी ४ या वेळेत मतदान होणार आहे. १० जून रोजी सायंकाळी ५ वाजता मतमोजणी होणार आहे.

उत्तर प्रदेशमधून सर्वाधिक ११, महाराष्ट्र आणि तामिळनाडूमधून प्रत्येकी ६, आंध्र प्रदेश ४, तेलंगणा २, छत्तीसगड २, मध्य प्रदेश ३, कर्नाटक ४, ओडिशा ३, पंजाब २, राजस्थान ४, उत्तराखंड १, बिहार ५, झारखंड २, हरयाणा २ या जागांवर निवडणूक होणार आहे.
राज्यसभेतून निवृत्त होणार्‍या सदस्यांमध्ये केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी, पियुष गोयल, निर्मला सीतारामन, अंबिका सोनी, पी. चिदंबरम, प्रफुल पटेल, संजय राऊत, विनय सहस्त्रबुद्धे अशा दिग्गज नेत्यांचा समावेश आहे. काल राज्यसभेत या सदस्यांच्या निरोपाचा औपचारिक सोहळा पार पडणार होता. मात्र भाजपचे राज्यसभेचे खासदार प्रवीण राष्ट्रपाल यांच्या निधनाचे वृत्त राज्यसभेत येताच राज्यसभेने दिवंगत सदस्याला श्रद्धांजली अर्पण करून सभा तहकूब केली.

राजीव कुमार नवे मुख्य निवडणूक आयुक्त
भारताचे नवे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून राजीव कुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राजीव कुमार हे १५ मे रोजी आपला पदाचा कार्यभार हाती घेतील. राजीव कुमार हे सुशील चंद्रा यांची जागा घेतील. १४ मे रोजी सुशील चंद्रा यांचा कार्यकाळ पूर्ण होईल.