नव्या कोरोनाबाधितांचा आकडा ३ हजारांच्या पार

0
22

देशात कोरोनाने पुन्हा डोके वर काढण्यास सुरुवात केली आहे. दिवसागणिक कोरोनाबाधितांच्या दैनंदिन संख्येत वाढ होत असल्याचे पाहायला मिळत आहे. कोरोनाबाधितांच्या वाढत्या आकड्यांनी पुन्हा एकदा देशाची चिंता वाढली आहे. गेल्या २४ तासांत देशात कोरोनाच्या ३,३०३ नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. या आकड्यासह देशातील सध्याची सक्रिय रुग्णांची संख्या वाढून १६ हजार ९८० वर पोहोचली आहे.

गेल्या काही दिवसांपासून देशातील दैनंदिन कोरोनाबाधितांच्या संख्येत कमालीची घट झाल्याचं पाहायला मिळत होते; परंतु, पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. देशातील दैनंदिन कोरोनाबाधितांसोबतच पॉझिटिव्हिटी दरही वाढल्याचे पाहायला मिळत आहे. सध्या देशाचा पॉझिटिव्हिटी दर वाढून ०.६६ टक्क्यांवर पोहोचला आहे. आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत २५६३ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत, तर गेल्या २४ तासांत ३९ रुग्णांनी आपला जीव गमावला आहे.