राज्यात गुलाबी रिक्षा धावणार; प्रशिक्षित महिला सारथ्य करणार

0
32

राज्यातील रस्त्यावर लवकरच गुलाबी रिक्षा धावताना दिसणार आहेत. स्वयंरोजगार सुरू करणास इच्छुक महिलांना गोवा आर्थिक विकास महामंडळा (ईडीसी)च्या मुख्यमंत्री स्वयंरोजगार योजनेच्या माध्यमातून गुलाबी रिक्षा विकत घेण्यासाठी कमी व्याज दरात कर्ज उपलब्ध केले जाणार आहे. गुलाबी रिक्षा योजनेसाठी १७ महिलांची निवड करण्यात आली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पत्रकारांशी बोलताना काल दिली.

गोवा आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी महामंडळाला झालेल्या नफ्यातील ८६ लाख रुपयांचा लाभांशाचा धनादेश मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्याकडे सुपूर्द केला, त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली.

राज्य सरकारचे ईडीसी हे एकमेव महामंडळ नफ्यात चालते. सरकारच्या इतर महामंडळांनी त्याची दखल घेऊन वाटचाल करण्याची गरज आहे. ईडीसीकडून मुख्यमंत्री स्वयंरोजगार योजना राबविली जात आहे. राज्यात गुलाबी रिक्षा खरेदीसाठी महिलांना कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे. पहिल्या टप्प्यात स्वयंरोजगार करण्यासाठी पुढे आलेल्या १७ महिलांना प्रशिक्षण देण्याचे काम सुरू आहे. त्या महिलांचे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांना रिक्षा उपलब्ध करून देण्यात येणार आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.