अवकाळी पाऊस राज्यात पुन्हा बरसला

0
28

राजधानी पणजीसह राज्यातील अनेक भागांत काल रात्री अवकाळी पावसाने हजेरी लावली. सुरुवातीला सोसाट्याचा वारा आणि त्यानंतर कोसळलेल्या पावसामुळे काही ठिकाणी झाडांची पडझड होऊन नुकसान झाले.

चार दिवसांपूर्वी सोमवारी अवकाळी पावसाने राज्यात हजेरी लावून दाणादाण उडवली होती. त्यानंतर काल रात्री ९ च्या सुमारास राज्यभरात विविध ठिकाणी पाऊस कोसळला. सुरुवातीला सुटलेल्या सोसाट्याच्या वार्‍याने पावसाच्या आगमनाची वर्दी दिली. त्यानंतर आकाशात विजा चमकण्यास सुरुवात होऊन पावसास सुरुवात झाली.

चिंबल, ताळगाव, बांबोळी, साखळी, डिचोली, म्हापसा, पेडणे, आजोशी मंडूर आदी भागात पावसाच्या सरी कोसळल्या. सोसाट्याच्या वार्‍यामुळे काही भागात विजेचा लपंडाव सुरू झाला होता.

दरम्यान, डिचोली तालुक्याला गुरुवारी साडेआठच्या दरम्यान वादळी वार्‍यासह मुसळधार पावसाने झोडपून काढले. परिणामी अनेक ठिकाणी पडझड झाली. आमोणा येथे घरावर वृक्ष कोसळला, तर मुळगाव, मये, साळ येथेही पडझड झाली.

दुचाकीवर वृक्ष पडल्याने दोघे जखमी

भांडारवाडा-आमोणा येथे रस्त्यावरील झाड अंगावर पडून प्रदीप नाईक व नीरज नाईक हे दोघे जखमी झाले. त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी हलवण्यात आले आहे. प्रदीप नाईक हा दुचाकीवरून जात असताना त्याच्या अंगावर झाड पडून तो जखमी झाला.