Home बातम्या पंतप्रधानांच्या सभेच्या ठिकाणाबाबत पेच

पंतप्रधानांच्या सभेच्या ठिकाणाबाबत पेच

0

निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार शैक्षणिक मालमत्तेत निवडणूक प्रचारसभा घेण्यास बंदी असल्याने साखळी येथील सरकारी महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित केलेल्या पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्या प्रचारसभेस परवानगी मिळण्यात अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे काल कॉंग्रेस पदाधिकार्‍यांची धावपळ सुरू होती.

निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार वरील मैदानावर प्रचारसभा घेणे शक्य नसल्याचे संयुक्त मुख्य निवडणूक अधिकारी नारायण नावती यांनी सांगितले.

कॉंग्रेसने वरील सभेसाठी उच्च माध्यमिक शिक्षण संचालक भास्कर नायक यांच्याकडे परवानगी मागितली होती. शिक्षण संचालनालयाने निवडणूक अधिकार्‍यांचा सल्ला मागितला असता अधिकार्‍यांनी कायद्यानुसार राजकीय सभेस मान्यता देणे शक्य नसल्याचे शिक्षण संचालकांना कळविले आहे. मिळालेल्या माहितीनुसार जिल्हाधिकार्‍यांनी उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाने ना हरकत दाखला दिल्यास आपण मान्यता देण्यास राजी असल्याचे कॉंग्रेस पदाधिकार्‍यांना सांगितले आहे. वरील मैदानात ही सभा घेण्यास अनुमती मिळावी यासाठी प्रयत्न सुरू असून निवडणूक आयोगाच्या निर्णयाची प्रतीक्षा केली जात आहे.