फलोत्पादनच्या केंद्रात दर्जेदार भाजी पुरवा

0
16

>> महामंडळाचे अध्यक्ष प्रेमेंद्र शेट यांची कंत्राटदारांना सूचना; अन्यथा कारवाई करणार

गोवा फलोत्पादन महामंडळाच्या भाजी विक्री केंद्रातून यापुढे दर्जेदार भाजी विक्री केली जाणार आहे. महामंडळाला भाजीचा पुरवठा करणार्‍या कंत्राटदारांची बैठक घेऊन त्यांना दर्जेदार भाजीचा पुरवठा करण्याची सूचना करण्यात आली असून, दर्जेदार भाजीचा पुरवठा न करणार्‍या कंत्राटदारावर कारवाई केली जाणार आहे, असा इशारा फलोत्पादन महामंडळाचे अध्यक्ष प्रेमेंद्र शेट यांनी काल दिला.

फलोत्पादन महामंडळाला दर्जेदार भाजीचा पुरवठा होत नसल्याने विक्रीमध्ये घट झालेली आहे. महामंडळाला भाज्यांची पुरवठा करणार्‍या अठरा कंत्राटदारांची बैठक घेऊन त्यांना आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच भाजी पुरवठा करू इच्छिणार्‍या नवीन कंत्राटदारांची बैठक घेऊन त्यांच्याशी चर्चा करण्यात आली आहे, अशी माहिती प्रेमेंद्र शेट यांनी दिली.

महामंडळाला भाजीचा पुरवठा करणार्‍या कंत्राटदारांच्या समस्या जाणून घेण्यात आल्या आहेत. महामंडळाकडून वेळेवर बिलांचे पैसे मिळत नाहीत, अशी मुख्य तक्रार आहे. कंत्राटदारांना वेळेवर भाजीची बिले फेडण्यासाठी प्राधान्य दिले जाणार आहे, असेही शेट यांनी सांगितले.
राज्यातील स्थानिक भाजी लागवड करणार्‍या शेतकर्‍यांच्या भाजीची खरेदीला प्राधान्य दिले जाणार आहे. त्या शेतकर्‍यांना वेळेवर बिलांची रक्कम देण्यास प्राधान्य दिले जाणार आहे, असेही अध्यक्ष शेट यांनी सांगितले.

अनेक भाजी विक्री केंद्रे बंद
यापूर्वी राज्यातील महामंडळाच्या भाजी विक्री केंद्रातून दरदिवशी सुमारे १५० ते १८० टन भाजी पुरवठा केला जात होता. आता दर्जेदार भाजीचा पुरवठा होत नसल्याने विक्रीमध्ये मोठी घट झालेली आहे. महामंडळाची सुमारे १४००
भाजी विक्री केंद्र आहेत. त्यातील अनेक भाजी विक्री केंद्रे बंद पडली
आहेत. बंद पडलेल्या आणि सुरू असलेल्या भाजी विक्री केंद्रांचे सर्वेक्षण
सुरू करण्यात आले आहे, असे प्रेमेंद्र शेट यांनी सांगितले.