>> सरपंच, स्थानिकांसह पत्रकार पोलिसांच्या ताब्यात
गावकरवाडा मये येथे ग्रामस्थांनी खाण वाहतूक अडवल्याने तेथे वातावरण तंग बनले. या प्रकरणी पोलिसांनी सरपंच तसेच स्थानिकांना व एका छायापत्रकाराला ताब्यात घेतले. त्यामुळे स्थानिक ग्रामस्थ संतप्त झाले. शिरगाव पैरा मयेतून लिलाव केलेल्या खनिज मालाची वाहतूक सुरू आहे.
काल महामाया मंदिराजवळ स्थानिकांनी खनिज वाहतूक अडवली. यावेळी त्या ठिकाणी पोलिसांनी तात्काळ धाव घेतली. या घटनेचे छाया वार्तांकन करण्यासाठी गेलेले पत्रकार संदीप देसाई यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. तसेच वाहतूक रोखण्यासाठी उपस्थित असलेल्या सरपंच सीमा आरोंदेकर, संजय आरोंदेकर, सखाराम पेडणेकर, राजन कारबोटकर यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन डिचोली पोलीस स्थानकात नेण्यात आले. ताब्यात घेतलेल्या लोकांना उपजिल्हाधिकार्यांसमोर हजर करण्यात येणार असून खनिज वाहतूक पुन्हा सुरू ठेवण्यात आल्याचे सांगण्यात आले.
अटक केलेल्यांची त्वरित
सुटका करा : कॉंग्रेस
मये येथील खराब रस्त्यांची दुरूस्ती व अखंडित पाणीपुरवठा यासाठी आंदोलन करणार्या लोकांना तसेच मोप येथील कष्टकरी कामगारांना आपल्या पगारासाठी आंदोलन करण्यास भाग पाडून राज्यातील काळजीवाहू भाजप सरकारने आपल्या असंवेदनशीलतेचे दर्शन घडवले असल्याचा आरोप काल कॉंग्रेस सरचिटणीस व नवनिर्वाचित आमदार युरी आलेमाव यांनी केला. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी अटक करण्यात आलेल्यांची विनाविलंब सुटका करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.