पहिल्याच दिवशी ७६१ मुलांना डोस

0
24

>> राज्यात १२-१४ वयोगटासाठी लसीकरण सुरू

राज्यातील १२ ते १४ वयोगटातील मुलांना कोविड लस देण्यास कालपासून प्रारंभ करण्यात आली असून पहिल्या दिवशी ७६१ मुलांना लस देण्यात आली आहे, अशी माहिती आरोग्य खात्याचे लसीकरण अधिकारी डॉ. राजेंद्र बोरकर यांनी दिली.

केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार १२ ते १४ या वयोगटातील मुलांना लस दिली जात आहे. पहिल्याच दिवशी राज्यातील १२ आरोग्य केंद्रांतून मुलांना कोविड लस देण्यास आली आहे. खास मुलांसाठी ही लस तयार करण्यात आली असून पूर्णपणे सुरक्षित आहे, असे डॉ. बोरकर यांनी सांगितले.

मुलांच्या लसीकरणाला अल्प कालावधीत चांगला प्रतिसाद मिळाला आहे. राज्यातील विद्यालये आणि सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांतून १२ ते १४ वयोगटातील मुलांना कोविड लस दिली जाणार आहे. राज्यातील सुमारे ५० हजार मुलांना कोविड लस देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे, अशी माहिती डॉ. बोरकर यांनी दिली.

राज्यातील ६० वर्षांवरील सर्व नागरिकांना बूस्टर डोस देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. यापूर्वी केवळ इतर आजार असलेल्या ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना बूस्टर डोस दिला जात होता. आता, ६० वर्षांवरील सर्वांसाठी बूस्टर डोस खुला करण्यात आला आहे, असेही डॉ. बोरकर यांनी सांगितले.

१९ जण कोरोनामुक्त
राज्यात मागील चोवीस तासांत आणखी १९ जण कोरोनामुक्त झाले असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.४१ टक्के एवढे आहे. राज्यात गेल्या चोवीस तासांत एकाही नवीन कोरोनाबाधिताला इस्पितळात दाखल करण्यात आलेले नाही.

कोरोनाचा एकही बळी नाही
राज्यात गेल्या चोवीस तासांत नवीन ६ कोरोनाबाधित आढळून आले असून आणखी कोरोना बळींची नोंद नाही. राज्यातील कोरोनाबाधितांची सक्रिय रूग्णसंख्या ७२ झाली आहे. राज्यात नवीन कोरोनाबाधितांच्या संख्येत लक्षणीय घट झाली असून मागील १६ दिवसांत नवीन २०७ बाधित आढळून आले आहेत. तर, ९ कोरोनाबाधितांचा बळी गेला आहे. राज्यातील कोरोना बळींची एकूण संख्या आत्तापर्यंत ३८३० एवढी आहे. गेल्या चोवीस तासांत नवीन ९१२ स्वॅबची तपासणी करण्यात आली आहे. त्यात ६ स्वॅबचे नमुने बाधित आढळून आले आहेत.