पंजाब विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसच्या पराभवानंतर माजी मुख्यमंत्री चरणजीतसिंग चन्नी यांची पक्षातून हकालपट्टी करण्याची मागणी होत आहे. चन्नी यांच्यावर अनेक कॉंग्रेस नेते नाराज आहेत. चन्नी यांच्या चेहर्यामुळे कॉंग्रेसचा पराभव झाल्याचे पक्षाच्या नेत्यांचे म्हणणे आहे. चन्नी यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप होऊनही पक्षाने निवडणुकीत चेहरा बदलला नाही, असे पंजाब कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष सुनील जाखड यांनी म्हटले आहे. तर कॉंग्रेस नेते दर्शन बराड यांनी, चन्नी आणि जाखड यांची पक्षातून हकालपट्टी करून नवज्योतसिंग सिद्धू यांच्याकडे पक्षाची संपूर्ण जबाबदारी द्यावी, अशी मागणी केली आहे. दरम्यान, ११७ सदस्यीय पंजाब विधानसभेत आम आदमी पक्षाने ९२ जागा जिंकल्या आहेत. निवडणुकीत कॉंग्रेसचा पराभव झाला आणि केवळ १८ जागा जिंकता आल्या. यामध्ये कॉंग्रेस पंजाब प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू यांचाही पराभव झाला आहे.