>> बळींपैकी १० जणांनी लस घेतलीच नाही; ८ दिवसांत तब्बल ८० बळी; लस न घेणार्यांसाठी तिसरी लाट ठरतेय जीवघेणी
राज्यात कोरोना महामारीच्या तिसर्या लाटेतील आत्तापर्यंतच्या सर्वाधिक २० कोरोना बळींची नोंद काल झाली. या मृतांमध्ये लस न घेतलेल्या १० जणांचा समावेश आहे. आतापर्यंत ज्या नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतलेले नाहीत, त्यांचा तिसर्या लाटेत मृत्यू होत असल्याचे आकडेवारीतून समोर आले आहे. राज्यात मागील एका आठवड्यात तब्बल ८० जणांचा मृत्यू झाला आहे, तर मागील २८ दिवसांत १४३ जणांचा कोरोनाने बळी घेेतला आहे. दरम्यान, गेल्या २४ तासांत नवीन १३२२ कोरोनाबाधित आढळून आले आहेत.
राज्यात कोरोना महामारीचा धोका वाढत असला, तरी कोविड निर्बंधाची अंमलबजावणी करण्यासाठी राज्य प्रशासनाकडून गंभीरपणे लक्ष दिले जात नाही, अशी स्थिती आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जास्त जमाव करण्यावर निर्बंध घातलेले असले तरी, उमेदवारांसोबत मोठ्या संख्येने समर्थक प्रचारात सहभागी होत आहेत. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढत आहे.
गेल्या चोवीस तासांत नवीन ४६४९ स्वॅबच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यातील १३२२ नमुने बाधित आढळून आले. राज्यात बाधित रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण २८.४३ टक्के एवढे आहे. राज्यात कोरोना बळींच्या संख्येत वाढ होत असून, गेल्या चोवीस तासात आणखी २० कोरोना रुग्णांचा बळी गेला आहे, त्यात लस न घेणार्याची संख्या जास्त आहे. कोरोना बळींची एकूण संख्या ३६६५ एवढी झाली आहे. राज्यात चोवीस तासांत ५४ जणांना इस्पितळांत दाखल करून घेण्यात आले असून, बर्या झालेल्या ४३ जणांना इस्पितळातून घरी पाठविण्यात आले आहे.
२६६८ जण कोरोनामुक्त
चोवीस तासांत नवीन बाधितांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या जास्त आहे. मागील चोवीस तासांत आणखी २६६८ जण कोरोनामुक्त झाले असून, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९३.४१ टक्के एवढे आहे. राज्यातील सक्रिय रुग्णसंख्येत घट होत असून, सध्या राज्यात ११ हजार ९०३ एवढे सक्रिय रुग्ण आहेत. राज्यात आत्तापर्यंत २ लाख ३६ हजार ३६१ जण नागरिक कोरोनाबाधित झाले असून, त्यातील २ लाख २० हजार ७९३ नागरिक बरे झाले आहेत.
गोमेकॉत ९ जणांचा मृत्यू
बांबोळी येथील गोमेकॉ इस्पितळात ९, दक्षिण गोव्यातील दोन खासगी इस्पितळात ४ आणि एका कोरोना रुग्णाचा उत्तर गोव्यातील खासगी इस्पितळात मृत्यू झाला. दक्षिण गोवा इस्पितळात ६ कोरोना रुग्णांना मृतावस्थेत आणण्यात आले, अशी माहिती दैनंदिन अहवालात देण्यात आली आहे.