निवडणुकीसाठी एकूण ५८१ अर्ज दाखल

0
29

>> आज होणार उमेदवारी अर्जांची छाननी; सोमवारी अंतिम चित्र स्पष्ट

गोवा विधानसभेच्या १४ फेब्रुवारी २०२२ रोजी होणार्‍या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत काल संपली. या निवडणुकीसाठी एकूण ५८१ उमेदवारी अर्ज दाखल झाले असून, उमेदवारी अर्जांची छाननी शनिवारी होणार आहे. ३१ जानेवारीला उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा दिवस असून, त्यानंतरच विधानसभा निवडणुकीतील उमेदवारांचे अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे.

राज्यात भाजपने राणे आणि मोन्सेरात या दांपत्याला उमेदवारी दिली आहे. उपमुख्यमंत्री चंद्रकांत कवळेकर हे भाजपच्या उमेदवारीवर, तर त्यांची पत्नी सावित्री कवळेकर यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. कॉंग्रेस पक्षाने लोबो दांपत्य आणि तृणमूल कॉंग्रेसने कांदोळकर दांपत्याला उमेदवारी दिली आहे.

शेवटच्या दिवशी आम आदमी पक्षाचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार अमित पालेकर (सांताक्रूझ), आमदार आंतोनियो फर्नांडिस (सांताक्रूझ), माजी आमदार मिकी पाशेको (नुवे), ऍड. कार्लूस पेरेरा (हळदोणा), माजी आमदार लवू मामलेदार (मडकई), सुदेश मयेकर (कळंगुट), सुधीर कांदोळकर (म्हापसा), रणजीत राणे (पर्ये), मनोज परब (थिवी), जितेश कामत (म्हापसा), बेंजामिन सिल्वा (वेळ्ळी), महादेव खांडेकर (साखळी), जितेंद्र गावकर (पेडणे), केदार नाईक (साळगाव), माजी आमदार व्हिक्टर गोन्साल्वीस (सांताक्रूझ), प्रसाद शहापूरकर (मांद्रे), ऍन्थोना मिनेझिस (कळंगुट), रितेश चोडणकर (पर्वरी) यांच्यासह अन्य उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले.