देशात कोरोना रुग्णसंख्येचा विस्फोट

0
13

>> चोवीस तासांत ९० हजारांवर बाधित

देशात काल कोरोना रुग्णसंख्येचा विस्फोट दिसून आला. गेल्या २४ तासांत देशात ९० हजारांहून अधिक नवीन रुग्ण आढळले. ही संख्या मागील दिवसाच्या तुलनेत ५६ टक्क्यांहून अधिक आहे. यादरम्यान ओमिक्रॉनबाधितांची संख्या २६०० च्या पुढे गेली आहे. याच दरम्यान पंजाबमध्ये एका विमानातील तब्बल १२५ जण पॉझिटिव्ह आढळले आहेत. या विमानात १७९ प्रवासी होते त्यापैकी १२५ जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. पॉझिटिव्ह आलेल्या प्रवाशांना संस्थात्मक विलगीकरणासाठी पाठवले जाणार असल्याचे, राज्य आरोग्य अधिकार्‍यांनी सांगितले.

देशात गेल्या २४ तासांत कोरोनाचे ९० हजार ९२८ नवीन रुग्ण आढळले तर ३२५ लोकांचा मृत्यू झाला. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, आता देशात सक्रिय रुग्णांची संख्या दोन लाख ८५ हजार ४०१ झाली आहे. त्याचबरोबर बुधवारी १९ हजार २०६ जण कोरोनामुक्त झाले आहेत. या साथीमुळे आतापर्यंत ४ लाख ८२ हजार ८७६ एवढ्या जणांचा मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत तीन कोटी ४३ लाख ४११ हजार ९ लोक संसर्गमुक्त झाले आहेत.