सध्याची रुग्णसंख्या ५ हजाराच्या दिशेन

0
11

>> चोवीस तासांत ९७१ कोरोनाबाधित, दोन मृत्यू

>> राज्यात सक्रिय रुग्ण ४६१३

राज्यात कोरोनाबाधित रुग्ण मोठ्या संख्येने आढळून येण्याचे प्रमाण कायम असून चोवीस तासांत नवीन ९७१ बाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर, २ रुग्णांचा बळी गेला आहे. राज्यात कोरोनाबाधित आढळून येण्याचे आत्तापर्यंतचे सरासरी प्रमाण १२.१४ टक्के एवढे आहे.

राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या ४६१३ एवढी झाली आहे. चोवीस तासात ४७४४ स्वॅबच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यातील ९७१ नमुने बाधित आढळून आले आहे. चोवीस तासांतील बाधित रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण २०.४६ टक्के एवढे आहे. इस्पितळामध्ये ११ बाधितांना दाखल करण्यात आले आहेत. तसेच इस्पितळामधून बरे झालेल्या ७ जणांना घरी पाठविण्यात आले आहेत.

राज्यातील सर्वच भागात कोरोनाबाधित आढळून येत आहेत.
पणजी आणि मडगावातील बाधिताच्या संख्येने पाचशेचा टप्पा पार केला आहे. मडगाव येथे सर्वाधिक ५८२ बाधित आहेत. पणजी येथे ५३२ बाधित आहेत. कासावली येथे ३५४, पर्वरी येथे २९०, कुठ्ठाळी येथे २७४, म्हापसा येथे २४४, फोंडा येथे २०५, कांदोळी येथे १६२, चिंबल येथे १९१, शिवोली येथे १९७, कुडचडे येथे ११६, वास्को येथे २८७, चिंचिणी येथे १५१, कुडतरी येथे ११६, लोटली येथे १४० बाधित आहेत.

भाजपच्या जाहीर प्रचारसभा रद्द
राज्यातील कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येमुळे भाजपने नियोजित केलेल्या सर्व निवडणूक जाहीर सभा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. भाजपचे उमेदवार, पदाधिकारी व कार्यकर्ते आता घरोघरी जाऊन निवडणूक प्रचार करण्यावर भर देणार आहेत. कोरोना महामारीच्या वातावरणात सुधारणा झाल्यानंतर जाहीर सभांच्या आयोजनाबाबत निर्णय घेतला जाणार आहे, अशी माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी पत्रकारांशी बोलताना काल दिली.

याचिकांवरील सुनावणी आभासी पद्धतीने
राज्यातील वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे मुंबई उच्च न्यायालयाया गोवा खंडपीठाकडून येत्या सोमवारपासून याचिकांवरील सुनावणी आभासी पद्धतीने (व्हर्च्युअल) घेतली जाणार आहे.

कर्नाटकमध्ये प्रवेशासाठी आरटीपीसीआर चाचणी
कर्नाटक राज्यात प्रवेशासाठी आरटीपीसीआर निगेटिव्ह अहवाल सक्तीचा करण्यात आला आहे. गोव्यात कोरोनाबाधित आणि ओमिक्रॉनचे रूग्ण आढळून येत असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. आरटीपीसीआर निगेटिव्ह अहवाल ७२ तासांपेक्षा जुना असता कामा नये, असे परिपत्रकात म्हटले आहे.
राज्यातील वाढत्या कोविडबाधिताची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी निर्बंध घालण्याबाबत उपजिल्हाधिकारी आढावा घेत असून याबाबत आदेश जारी केला जाणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल दिली.