ऐन दिवाळीत वीज खंडित, पाणी टंचाई

0
40

राज्यात अनेक ठिकाणी सध्या दीपावली उत्सव सुरू आहे. अशा या दिवाळी उत्सवातच राज्यातील बर्‍याच ठिकाणी वीजेची टंचाई जाणवली. त्यासोबत अनेक ठिकाणी पाण्याचीही कमतरता जाणवत होती. त्यामुळे राज्य शासनाच्या या कारभाराविरोधात नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त होत होत आहे.

काल दि. ४ नोव्हेंबर रोजी राज्यात दीपावलीची धूम सुरू होती. दीपावली हा दीपांचा उत्सव मानला जातो. मात्र या दिव्यांच्या उत्सवातच ऐन दिवाळी दिवसी व पूर्वसंध्येलाही बर्‍याच ठिकाणी वीज गायब झाली होती. राज्यातील काही ठिकाणी तर दिवाळी दिवशी पहाटेच वीज गायब झाली होती. बार्देश तालुक्यातील म्हापसा, पर्वरी भागात अनेक ठिकाणी सकाळी विजेचा लपंडाव सुरू होता.

दिवाळीच्या पूर्वसंध्येला राज्यात पाऊस पडत होता. त्यामुळे नरकासुर तयार करणार्‍या युवकांच्या मेहनतीवर पाणी फेरले गेले होते. अनेक ठिकाणी नरकासुर पावसामुळे भिजू नयेत म्हणून ते झाकून ठेवण्यात येत होते. गेले दोन ते तीन दिवस राज्यात पाऊस पडत असल्यामुळे उत्साहावर विरजण पडण्याची शक्यता दिसून येत होती. गेल्यावर्षी कोविडमुळे दीपावली उत्सव साजरा करता आला नव्हता. मात्र यंदा कोविडची भीती कमी झाल्यामुळे व रुग्णांची संख्यादेखील राज्यात आटोक्यात येत असल्यामुळे दिवाळीची धूम सर्वत्र दिसून येत होती. मात्र पहाटे वीजपुरवठा खंडित होत होता. अनेक भागात वीजेमुळे पाण्याचीही टंचाई जाणवत होती.

मये गाव अंधारमय
भर दीपावलीच्या दिवशी मये गाव अंधारमय होऊन राहिला. त्यामुळे मयेवासीयांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. या खंडित वीजप्रकरणी डिचोली वीज विभागाच्या साहाय्यक अभियंत्यांना फोनद्वारे विचारल्यास ओव्हर लोड, झाडे, फांद्या पडतात असे कारण सांगण्यात आले. परंतु मये गावी गेला महिनाभर विजेचा लपंडाव चालूच असून दिवसा तसेच रात्री विजेचा बंद ओव्हरलोडची सबब सांगितली जाते, हे संतापजनक असल्याचे येथील नागरिकांनी सांगितले.

पर्वरीत विजेचा लपंडाव
बार्देश तालुक्यातील पर्वरी परिसरातही काल ऐन दिवाळीच्या धामधुमीत बर्‍याच ठिकाणी विजेचा लपंडाव सुरू होता. पहाटेपासून वीज येत व जात होती. त्यामुळे पर्वरीवासीयांत संताप दिसून येत होता. सकाळी पहाटेच्यावेळीच वीजपुरवठा खंडित झाला होता. त्यानंतर विजेचे ये-जा सुरू होते. त्यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली.

ताळगावात पाणी टंचाई
काल ऐन दिवाळीच्या दिवशी ताळगाव परिसरात अनेक ठिकाणी पाण्याचा पत्ताच नव्हता. दिवाळीच्या दिवशी अभ्यंगस्नान केले जाते. मात्र पाण्याच्या अभावी अनेकांना स्नान उरकून घ्यावे लागले. दिवाळीच्या सणादिवशीच पाण्याचा अत्यल्प पुरवठा झाल्यामुळे अनेकांनी सरकारच्या नावे संताप व्यक्त केला.

फोंड्यात वीजपुरवठा गायब

दिवाळी सणाची धामधूम सुरू असतानाच बेभरवशाच्या वीजपुरवठ्यामुळे फोंड्यातील काही भागात व ग्रामीण भागात विजेअभावी लोकांना त्रास सहन करावा लागला.

बुधवारी दुपारनंतर वीजपुरवठा सुरळीत न झाल्याने दुर्भाट, रामनाथी, बोकडबाग, कवळे व तळावली आदी ग्रामीण भागात विजेचा लपंडाव सुरू होता. दिवाळीचा उत्सव असतानाच वारंवार खंडित विजेमुळे लोकांना त्रास सहन करावा लागला. हा खंडित विजेचा प्रकार गुरुवारी रात्रीपर्यंत कायम होता. दिवसातून अनेकवेळा वीज गायब होत असल्याने लोकांना काही ठिकाणी अंधारातच रात्र काढावी लागली. याबाबत लोकांनी वीज कार्यालयाला फोन केले असता समाधानकारक उत्तर न मिळाल्याचे लोकांचे म्हणणे आहे. वीज खात्याने खंडित विजेचा प्रकार थांबवून लोकांना होणारा त्रास दूर करावा, अशी मागणी लोकांनी केली आहे. खंडित वीजपुरवठ्याचा परिणामुळे लहान-मोठ्या व्यावसायिकांवरही परिणाम झाला.