कोव्हॅक्सिन लशीला डब्ल्यूएचओची मान्यता

0
30

भारत बायोटेकनिर्मित कोव्हॅक्सिन लशीच्या आपत्कालीन वापरास जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) अखेर बुधवारी मंजुरी दिली. या निर्णयामुळे कोव्हॅक्सिन लस घेतलेल्या भारतीयांचा परदेश प्रवासाचा मार्ग सुकर झाला आहे.

भारताच्या औषध महानियंत्रकांनी कोव्हॅक्सिन लशीच्या आपत्कालीन वापरास परवानगी दिल्यानंतर देशाच्या लसीकरण मोहिमेत या लशीचा वापर करण्यात आला. सध्या देशात सहा लशींना आपत्कालीन वापराची परवानगी देण्यात आली आहे. त्यापैकी ऍस्ट्राझेनेका आणि ऑक्सफर्ड विद्यापीठाने विकसित केलेल्या आणि सीरम इन्स्टिट्यूटने उत्पादित केलेल्या कोव्हिशिल्डबरोबरच कोव्हॅक्सिनच्या लसमात्रांचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात आला.

‘डब्ल्यूएचओ’च्या तांत्रिक सल्लागार गटाने २६ ऑक्टोबर रोजी भारत बायोटेककडे लशीबाबत आणखी तपशील मागवला होता. कोव्हॅक्सिनच्या मंजुरीची प्रतीक्षा लांबल्याने परदेशी जाऊ इच्छिणार्‍या या लसवंतांमध्ये अस्वस्थता होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जी-२० परिषदेनिमित्त नुकतीच ‘डब्ल्यूएचओ’च्या संचालकांची भेट घेतली होती. अखेर तांत्रिक सल्लागार गटाच्या शिफारशीनंतर ‘डब्ल्यूएचओ’ने कोव्हॅक्सिन लशीला परवानगी दिली आहे.

कोव्हॅक्सिन लस ७८ टक्के परिणामकारक असल्याचे भारत बायोटेकने जूनमध्ये जाहीर केले होते. त्यानंतर या लशीला आपत्कालीन वापराची परवानगी मिळावी, यासाठी भारत बायोटेकने जागतिक आरोग्य संघटनेकडे अर्जासह चाचण्यांचा तपशील पाठवला होता.