Home Featured खांडोळा-सांतइस्तेव्हमध्ये परप्रांतीय मजुराचा खून

खांडोळा-सांतइस्तेव्हमध्ये परप्रांतीय मजुराचा खून

0

फोंडा पोलीस स्थानकाच्या कक्षेत येत असलेल्या खांडोळा – सांत इस्तेव्हमध्ये एका परप्रांतीय मजुराचा जबर मारहाणीमुळे मृत्यू झाला. फोंडा पोलिसांनी या प्रकरणी अज्ञाताविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदवला आहे. हा प्रकार रविवारी सकाळी घडला. मृत व्यक्तीचे नाव हरींदर हिरालाल प्रसाद (४४) असे असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

एक अज्ञात इसम रक्तबंबाळ अवस्थेत खांडोळा – सांतइस्तेव्ह पुलाच्या खाली नदीकाठी पडल्याची माहिती स्थानिकांनी १०८ रुग्णवाहिकेला दिल्यानंतर त्याला तातडीने उपचारासाठी बेतकी आरोग्य केंद्रात आणण्यात आले. मात्र इस्पितळात नेण्याआधीच त्याचा मृत्यू झाला. त्यामुळे डॉक्टरांनी फोंडा पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी इस्पितळात धाव घेतली असता हरींदरच्या डोक्यावर तसेच शरीराच्या अन्य भागावर गंभीर स्वरुपाच्या जखमा आढळल्या.

पोलिसांनी मृतदेह शवचिकित्सेसाठी बांबोळी इस्पितळात पाठवला आहे. हरींंदर हा मूळ बिहारचा असून तो व त्याचा अन्य एक भाऊ अमयवाडा- खांडोळा येथे भाड्याच्या खोलीत राहत होते. हरींदर हा कंत्राटदारामार्फत गवंडी काम करीत होता. मात्र त्याचा खून करण्यासाठी त्याच्यावर जबरी हल्ला चढवला असल्याचे निदर्शनास आले असून हल्लेखोर एकटा की अन्य साथीदार होते याबाबत पोलीस तपास करीत आहेत. पोलिसांनी काही संशयितांना ताब्यात घेतले असून या प्रकरणाच्या अधिक चौकशीला सुरूवात केली आहे.

पंधरा दिवसांत तिसरा खून
फोंडा पोलीस स्थानकाच्या हद्दीत पंधरा दिवसांच्या कालावधीत हा तिसरा खून झाला आहे. गेल्या १६ ऑक्टोबर ला फोंड्यात दोन वृद्ध महिलांचा खून करण्यात आला होता आता तिसर्‍या खुनाची नोंद झाली आहे.