दहावी, बारावी परीक्षांच्या तारखा जाहीर

0
61

>> परीक्षा होणार दोन सत्रात, प्रत्येक सत्र ५० टक्क्यांचे

गोवा शालांत मंडळाने काल इयत्ता दहावी आणि बारावीसाठीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. त्यानुसार इयत्ता दहावीसाठीच्या प्रथम सत्राच्या परीक्षा बुधवार दि. १ डिसेंबरपासून सुरू होणार असून दुसर्‍या सत्राच्या परीक्षा दि. ४ एप्रिल २०२२ पासून सुरू होणार आहेत. तसेच इयत्ता बारावीच्या प्रथम सत्रातील परीक्षा दि. ८ डिसेंबरपासून सुरू होणार आहेत. तर द्वितीय सत्राच्या परीक्षा १८ मार्च २०२२ पासून सुरू होणार आहेत.

२०२१-२२ ह्या शैक्षणिक वर्षाला मंडळाने एक सत्र परीक्षेऐवजी दहावी आणि बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेसाठी एक विशेष निर्धारण योजना तयार केली आहे. कोविड महामारी लक्षात घेऊन मंडळाने सदर व्यवस्था केली आहे. मंडळाने २०२१-२२ हे शैक्षणिक वर्ष दोन सत्रात विभागले असून पहिले सत्र हे नोव्हेंबर – डिसेंबर महिन्यात संपेल. तर दुसरे सत्र हे मार्च – एप्रिल महिन्यात संपणार आहे.

प्रत्येक सत्र ५० टक्क्यांचे
ह्या नव्या व्यवस्थेनुसार दोन्ही सत्रांतील परीक्षा ह्या प्रत्येकी ५० टक्क्यांच्या असतील. त्यातील पहिले सत्र हे बहुपर्यायी प्रश्‍न व एका गुणाचे प्रश्‍न असे असेल. तर उर्वरीत ५० टक्क्यांचे दुसरे सत्र हे वस्तुनिष्ठ प्रश्‍नांचे असेल. २०२१ -२२ या शैक्षणिक वर्षासाठीचा अभ्यासक्रम हा दोन सत्रांत विभागण्यात येणार आहे. शालांत मंडळ दर एका सत्राच्या शेवटी विभागण्यात आलेल्या अभ्यासक्रमाच्या आधारे परीक्षा घेणार आहे, असे शालांत मंडळाने काल जारी केलेल्या माहिती पत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.

शाळा गजबजल्या

दरम्यान, नववी ते बारावीपर्यंतचे प्रत्यक्ष वर्ग सोमवारपासून सुरू झाले. कोरोना संकटामुळे बहुतांश व्यवहार ठप्प झाले होते. त्यात शिक्षण संस्थांचाही समावेश होता. राज्यात २०१९-२० वर्षाच्या दहावीच्या परीक्षा ऑफलाइन पद्धतीने घेण्यात आल्या होत्या. मात्र, कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागल्याने शाळा बंद केल्या व ऑनलाइन पद्धतीने वर्ग सुरू करण्यात आले. तर २०२०-२१ सालच्या अंतिम वर्षाच्या सर्वच परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आल्या. नवे शैक्षणिक वर्ष यंदा उशिरा सुरू झाले आहे. सध्या राज्यात कोरोनाबाधितांची संख्या कमी झाल्यामुळे राज्यभरातील सर्व व्यवहार हळूहळू सुरू झाले. सरकारने परवानगी दिल्यानंतर सर्व औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) तसेच महाविद्यालयाच्या तिसर्‍या वर्षाचे वर्गही सुरू झाले. काही शाळांत दहावीचे वर्गही सुरू आहेत. त्यानंतर गेल्या आठवड्यात मुख्यमंत्र्यांनी ९ वी ते १२ वीपर्यंतचे सर्व वर्ग सुरू करण्याची घोषणा केली. नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्याची शिफारस सर्वांत आधी तज्ज्ञ समितीने केली होती. नंतर कृती समितीने प्रत्यक्ष वर्ग सुरू करण्याला मान्यता दिली. त्यामुळे सोमवारपासून प्रत्यक्ष वर्ग सुरू झाले आहेत. मात्र इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतचे शिक्षम मात्र सध्या तरी ऑनलाइनच राहील.