कोविड बळी, प्राणवायूवरून विधानसभेत गदारोळ

0
36

>> विजय सरदेसाईंकडून मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी

कोविडमुळे राज्यात आतापर्यंत किती जणांचा मृत्यू झाला, या प्रश्‍नाचे उत्तर देण्यास सरकारने काल विधानसभेत असमर्थता दर्शवल्यानंतर विरोधकांनी सभागृहात गोंधळ घातला. त्यामुळे सभापती राजेश पाटणेकर यांना अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी प्रश्‍नोत्तराच्या तासाला सभागृहाचे कामकाज तहकूब करावे लागले. दुसरीकडे, कोविडच्या दुसर्‍या लाटेवेळी गोमेकॉत किती रुग्णांचे प्राणवायूअभावी बळी गेले, याचा अभ्यास करण्यासाठी नेमलेल्या समितीने दिलेला अहवाल काल फुटला. सदर समितीने आपल्या अहवालात दुसर्‍या लाटवेळी गोमेकॉत प्राणवायूचा मोठा तुटवडा होता आणि तो सरकारच्या गलथान कारभारामुळे निर्माण झाला होता, असे आपल्या अहवालातून स्पष्ट केल्याच्या पार्श्‍वभूमीवर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी विजय सरदेसाई यांनी केली. त्यानंतर निर्माण झालेल्या गदारोळामुळे सभापतींनी सभागृहाचे कामकाज दुपारी १२.३० वाजेपर्यंत तहकूब केले.

काल सकाळी ११.३० वाजता गोवा विधानसभा अधिवेशनाचे कामकाज सुरू झाले. प्रश्‍नोत्तराच्या तासाला विरोधी आमदारांनी विचारलेल्या प्रश्‍नांपैकी कित्येक प्रश्‍न सरकारने पुढील अधिवेशनापर्यंत पुढे ढकलण्याचे सत्रच आरंभले. त्यात कोविडमुळे राज्यात आतापर्यंत किती जणांचा मृत्यू झाला आहे, या प्रश्‍नासह, राज्यातील कोमुनिदाद जमिनींचे घोटाळे, मोपा विमानतळासंबधीचा प्रश्‍न, राज्यात झालेले जमीन घोटाळे, सार्वजनिक आरोग्य सेवा क्षेत्रातील खरेदी आदी प्रश्‍नांचा समावेश होता; मात्र सर्वच संबंधित मंत्र्यांनी प्रश्‍नांची उत्तरे देण्यास असमर्थता दर्शवत आपले प्रश्‍न पुढील विधानसभा अधिवेशनापर्यंत पुढे ढकलण्यात यावेत, अशी मागणी सभापतींकडे केल्याने विरोधी आमदार आक्रमक बनले.

यावेळी आमदार विजय सरदेसाई हे आपल्या स्थानावरून उठले व कोविडमुळे आतापर्यंत राज्यात किती रुग्णांचा मृत्यू झाला, त्याची माहिती सरकारने ताबडतोब द्यावी, अशी मागणी करीत त्यांनी सभापतींच्या आसनामोरील मोकळ्या जागेत धाव घेतली. त्यानंतर त्यांच्यापाठोपाठ विरोधी पक्षनेते दिगंबर कामत, आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स, विनोद पालयेकर, जयेश साळगावकर, रोहन खंवटे यांनीही सभापतींच्या आसनासमोरील मोकळ्या जागेत धाव घेतली.
कोविडच्या दुसर्‍या लाटेवेळी गोमेकॉत किती रुग्णांचे प्राणवायूच्या कमतरतेमुळे मृत्यू झाले होते, याचा अभ्यास करण्यासाठी नेमलेल्या समितीने दिलेला अहवाल ज्या वृत्तपत्रातून प्रसिद्ध झाला होता, ते वृत्तपत्र विजय सरदेसाई यांनी सभापतींना दाखवले. प्रसिद्ध झालेल्या अहवालातून राज्य सरकारच्या गलथान कारभारामुळे गोमेकॉत प्राणवायूची मोठी कमतरता निर्माण झाली होती. परिणामी तेथे उपचार घेणार्‍या कित्येक कोविड रुग्णांचे बळी गेले होते, असे अहवालातून स्पष्ट करण्यात आलेले असल्याने डॉ. प्रमोद सावंत यांनी त्याची नैतिक जबाबदारी स्वीकारून मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी सरदेसाई यांनी केली.

या विषयावरून विरोधी आमदारांनी गदारोळ माजवल्यामुळे सभापती राजेश पाटणेकर यांनी विधानसभेचे कामकाज दुपारी १२.३० वाजेपर्यंत तहकूब केले. त्यामुळे प्रश्‍नोत्तराच्या तासाला कोणतेही कामकाज होऊ शकले नाही.
यावेळी विजय सरदेसाई, दिगंबर कामत, आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स, रोहन खंवटे यांनी विविध प्रश्‍नांवरून सरकारवर जोरदार टीका केली. प्रत्येक प्रश्‍न सरकार पुढच्या अधिवेशनापर्यंत पुढे ढकलत आहे. त्यामुळे आता निवडणुकीपूर्वी पुढचे अधिवेशन कधी होणार, असा सवाल रोहन खंवटे, आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स आदींनी उपस्थित केला.

राज्य सरकारच्या गलथान कारभारामुळे गोमेकॉत प्राणवायूचा मोठा तुटवडा निर्माण झाला होता. त्यामुळेच अनेक कोविड रुग्णांचे बळी गेले होते, ही बाब अहवालातून स्पष्ट झाल्याने डॉ. प्रमोद सावंत यांनी त्याची नैतिक जबाबदारी स्वीकारून मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा. – विजय सरदेसाई, (आमदार, गोवा फॉरवर्ड)

सरकार एकाही महत्त्वसच्या प्रश्‍नावरून उत्तर देऊ पाहत नाही. राज्यातील कोमुनिदाद जमिनी तसेच अन्य जमिनींत मोठ्या प्रमाणात घोटाळे झालेले आहेत. एका सेरुला कोमुनिदादीच्या जमिनीत सुमारे ५० कोटी रुपयांचा घोटाळा आहे; मात्र यासंबंधी विरोधकांनी विचारलेल्या प्रश्‍नांचे उत्तर न देता सरकार प्रत्येक अधिवेशनात हे प्रश्‍न पुढे ढकलून वेळ मारून नेत आहे. – रोहन खंवटे, (आमदार, अपक्ष)