महती भारतीय संस्कृतीची

0
78

योगसाधना – ५२४
अंतरंग योग – १०९

  • डॉ. सीताकांत घाणेकर

आज आपण आपल्या भारतीय संस्कृतीचा, त्यावेळच्या ज्ञानाचा, पद्धतींचा अभ्यास करत नाही. उलट पाश्‍चात्त्य संस्कृती आमच्या जीवनात आणतो. त्या संस्कृतीतसुद्धा अनेक चांगल्या गोष्टी आहेत पण आपली संस्कृती फार उच्च कोटीची व गहन आहे. मानवाच्या सर्वांगीण विकासाचा तसेच विश्‍वकल्याणाचा इथे शास्त्रशुद्ध विचार केला जातो.

प्रत्येक मानवाची अशी प्रामाणिक इच्छा असते की प्रत्येकाला ज्ञान, धन, शक्ती, सुख, समृद्धी.. इत्यादी सर्व मिळावे. भारतीय संस्कृतीमध्ये या सर्वांची पवित्रता राखली जावी म्हणून विविध देवतांचा संबंध त्यांच्याशी जोडला गेला आहे.

  • विद्येची देवता – श्रीसरस्वती
  • धनाची देवता – श्रीमहालक्ष्मी
  • शक्तीची देवता – श्रीदुर्गा
    तीनही गोष्टी महत्त्वाच्याच आहेत पण मुख्य गोष्ट हवी ती म्हणजे ज्ञान. ज्ञानाशिवाय इतर गोष्टी मिळणे कठीण आहे. अर्थात अपवाद आहेत. पण मुख्य म्हणजे या सर्वांची पवित्रता राखण्यासाठी योग्य ज्ञान अत्यावश्यक आहे.
    अंतरंग योग या सदरामध्ये आपण कित्येक दिवस श्रीसरस्वतीदेवीचा विविध पैलूंमध्ये सखोल विचार करीत आहोत.

एक छान श्‍लोक आहे जो विद्येचे महत्त्व सांगतो –

‘‘विद्या नाम नरस्य रूपमधिकं पच्छन्नगुप्तं धनं
विद्या भोगकरी यशः सुखकरी विद्या गुरुणां गुरुः|
विद्या बन्धुजनो विदेशगमने विद्या परं दैवतं
विद्या राजसु पूज्यते नहि धनं विद्याविहीनः पशु ॥

प्रत्येक शब्द काळजीपूर्वक वाचला तर या श्‍लोकाचा अर्थ स्पष्टपणे ध्यानात येतो.

  • विद्या कुरुपाला रूप प्रदान करते.
  • ती मानवाचे गुप्त धन आहे.
  • परदेशात ती बंधुजनांची गरज पुरी करते.
  • विद्या श्रेष्ठ देवता आहे.
  • ती सर्वत्र पूजली जाते. विद्येशिवाय माणूस पशुसमान आहे.
    या सुंदर श्‍लोकावर थोडा जरी विचार केला तर लक्षात येते की विद्येचे महत्त्व मानवी जीवनात व विश्‍वकल्याणात किती आहे ते?
    पू. पांडुरंगशास्त्री म्हणतात – ‘‘सरस्वतीचे वाहन मयुर आहे. मोर हा कलेचे प्रतीक आहे. सरस्वती कलेचीही देवता आहे. चौदा विद्या आणि चौसष्ट कला हे सर्व सरस्वती उपासनेत येते. कला जीवन प्रदान करते आणि विद्या जीवन देते. अशा रीतीने सरस्वती आपल्या समग्र अस्तित्वाला व्यापून आहे. सरस्वतीच्या उपासकाची कदर समाज करो वा न करो, ज्ञानाचा वाहक म्हणून त्याचा सन्मान करून भगवान अवश्य माथ्यावर घेईल. या गोष्टीची प्रचिती भगवान श्रीकृष्णाने मोरपिसाला मस्तकावर धारण करून केलेली आहे.
    या संदर्भात पू. शास्त्रीजी मोर व मोरपीस यांच्यामध्ये झालेला संवाद एक श्‍लोक सांगून त्याद्वारे मोरपीसाचे महत्त्व प्रतिपादित करतात –

‘‘अस्मान्विचित्रवपुषस्तव पृष्ठलग्नात्
कस्माद्विमुञ्चासि भवान् यदि वा विमुञ्च |
रे नीलकण्ठ गुरुहानिरियं तवैव
गौपालसूनु मुकुटे भवति स्थितिर्नः॥

मोरपीस मोराला म्हणते – ‘‘दीर्घकाळपर्यंत तुझ्या पाठीवर राहून मी तुझी शोभा वाढवली आहे; अशा मला तू का झटकून टाकतोस? भले तू मला सोडत असशील परंतु त्यात तुझेच मोठे नुकसान होणार आहे. तुझी शोभा नष्ट होणारी आहे. माझे स्थान तर गोपाळकृष्णाच्या मुगुटात आहे.’’
या श्‍लोकावर थोडे चिंतन केले की लगेच लक्षात येते ती म्हणजे समाजाची स्थिती व अविचारीपणा – ज्ञानी विद्वान माणसाला समाज अपेक्षित महत्त्व देत नाही. अपवाद अवश्य आहेत.

वेगवेगळ्या व्यक्तींची प्रतिक्रिया वेगवेगळी असते.

  • काहीजण मानतात की माझ्या ज्ञानाची कदर समाज घेवो न घेवो, मी देवी सरस्वतीची सेवा करतो. तीच माझी खरी पूजा होय. भगवंत माझ्या ज्ञानाची, कार्याची नोंद घेतो, हेच मोठे. मी कृतज्ञ आहे. इथे मोरपीसाचे मत फार मूल्यवान आहे. मोराने जरी टाकून दिले तरी पूर्णपुरुषोत्तम योगेश्‍वर श्रीकृष्ण त्याला आपल्या मुकुटावर धारण करतो. एवढ्याशा टाकून दिलेल्या मोरपीसाचा केवढा मान हा! खरेच, नुकसान समाजाचे, विश्‍वाचे, मानवाचे होते – जेव्हा विद्वान व्यक्तीला मान दिला जात नाही तेव्हा चौफेर नजर टाकली तर कितीतरी उदाहरणे दृष्टिक्षेपात येतील.

बहुदा समाज रूपरंग बघतो. याचे उत्कृष्ट उदाहरण म्हणजे – ज्ञानी पंडित अष्टावक्र व राजा जनकाच्या दरबारातील तथाकथित विद्वान. गोष्ट अत्यंत बोधप्रद आहे –
जेव्हा अष्टावक्र दरबारात प्रवेश करतो तेव्हा सर्व तथाकथित पंडित त्याचे रूप पाहून हसतात. म्हणून अष्टावक्रदेखील मोठ्यामोठ्याने हसतो. जनकाने कारण विचारल्यानंतर अष्टावक्राचे उत्तर खरेच ज्ञानपूर्ण आहे.

तो म्हणतो की त्याची अपेक्षा होती की ज्ञानी, योगी जनकाच्या दरबारात सगळे पंडित असतील पण इथे तर सर्व चांभारच आहेत – जनावराची चामडी बघणारे!

  • थोड्या ज्ञानी व्यक्तींना नाव- प्रसिद्धी हवी असते. ते कुणाचातरी आश्रय घेतात- व्यक्ती, संस्था, सरकार. तिथे त्यांना इतरांची खुशामत करावी लागते. अशा तर्‍हेने ते स्वतःचा स्वाभिमान घालवून बसतात. स्वतःच्या आत्म्याचे नुकसान करतात. अनेकवेळा त्यांचा स्वार्थ असतो अथवा परिस्थिती असते.
    याचे उदाहरण म्हणजे महाभारतातील – द्रोण, द्रुपद, कौरव. गोष्ट सर्वांनाच माहीत असेल. सारांश असा-
    गुरुकुलात असताना द्रुपदाने द्रोणाला अर्धे राज्य देण्याचे वचन दिले होते. द्रुपद राजा झाला. द्रोणही आपल्या घरी गेला. गरिबीमुळे तो आपल्या मुलाला, अश्‍वत्थाम्याला दूध देऊ शकला नाही. त्याच्या पत्नीने मुलाला गव्हाच्या पीठात पाणी घालून दूध म्हणून पाजले.

द्रोणाला आपल्या गरिबीचा तिटकारा आला. तो आपला परममित्र द्रुपदाकडे गेला व अर्धे राज्य मागितले. द्रुपदाने त्याचा अपमान करून हाकलून दिले. त्याचवेळी भीष्मपितामह कौरव-पांडवांना शिकवण्यासाठी गुरूच्या शोधात होते. द्रोणाला ती आयतीच संधी मिळाली. परिस्थिती, सूड भावना व स्वार्थ यामुळे द्रोण राज्याश्रित झाला.

क्षणोक्षणी दुर्योधन त्यांचा अपमान करू लागला. त्यात कहर म्हणजे द्रौपदी वस्त्रहरणाच्या वेळी एवढे सामर्थ्य असूनही द्रोणाला ती घटना बघावी लागली. त्यावेळीसुद्धा दुर्योधनाने त्यांना त्यांच्या पदाची आठवण करून दिली.
एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे ती म्हणजे * भारतीय संस्कृतीप्रमाणे वेदशास्त्र पारंगत ब्राह्मण राज्याश्रित होत नसत. ते स्वतःचा आश्रम सुरू करत असत. तिथे राज्यातील सर्वजण जात असत- प्रजा व राजा. आश्रमात कसलाही भेदभाव नसे. प्रत्येकाच्या कर्तृत्वशक्तीप्रमाणे गुरू शिष्याला विद्या दान करत असत.

या विचारामध्ये एक फार मोठे तत्त्व म्हणजे ‘‘गुरू लाचार होता कामा नये. त्याची संपूर्ण प्रतीष्ठा राखली जावी’’.
महर्षी वसिष्ठ, म. विश्‍वामित्र तसेच इतर ऋषी यांचे स्वतंत्र आश्रम होते. त्यामुळे त्यांना समाजात, राजदरबारात मानाचे, आदराचे स्थान असे. हजारो विद्यार्थी आश्रमात विनामूल्य शिक्षण घेत असत. इतिहासात नोंद आहे की महर्षी वसिष्ठांच्या आश्रमात साठ हजार निवासी विद्यार्थी असत. ती पद्धतच वेगळी होती. म. वसिष्ठांच्या आश्रमात जाताना दशरथ, राम अथवा इतर राजे रथाखाली उतरून, मुकुट, धनुष्य रथात ठेवून नम्र होऊन आश्रमात प्रवेश करीत. अशा तर्‍हेने विद्वानांना म्हणजे ज्ञानदेवता सरस्वतीला मान दिला जाई.
आज आपण आपल्या भारतीय संस्कृतीचा, त्यावेळच्या ज्ञानाचा, पद्धतींचा अभ्यास करत नाही. उलट पाश्‍चात्त्य संस्कृती आमच्या जीवनात आणतो. त्या संस्कृतीतसुद्धा अनेक चांगल्या गोष्टी आहेत पण आपली संस्कृती फार उच्च कोटीची व गहन आहे. मानवाच्या सर्वांगीण विकासाचा तसेच विश्‍वकल्याणाचा इथे शास्त्रशुद्ध विचार केला जातो.
आपल्या योगसाधकांमध्ये अनेक विद्वान आहेत त्यांना हा विचार नक्कीच माहीत असेल. (संदर्भ ः पू. पांडुरंगशास्त्री आठवले – संस्कृती पूजन)