मंगला कामत व जीवन कामत या बहिणींच्या खून प्रकरणी मुख्य संशयित महादेव घाडी याला चार दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. तसेच मंगला कामत व जीवन कामत या दोन्ही वृद्ध बहिणींचा मृत्यू हा डोक्यावर धारदार शस्त्राने वार केल्याने तसेच अतिरक्तस्त्रावामुळेच झाल्याचे शवचिकित्सा अहवालात नमूद करण्यात आले आहे. १६ रोजी फोंड्यातील कामत रेसिडेन्सीमध्ये मंगला कामत व जीवन कामत या दोन्ही बहिणींचा संशयित घाडी याने चॉपर तसेच कोयत्याचे घाव घालून निर्घृण खून केला होता. त्यानंतर पोलिसांनी २४ तासांत खुनाचा छडा लावत महादेव घाडी याला अटक केली होती. त्यानंतर त्याने खुनाची कबुली देखील पोलिसांसमोर दिली होती. कामत भगिनींनी महादेवला उसने दिलेले पैसे त्याच्याकडून परत मागितल्यानेच त्याने दोन्ही बहिणींचा खून केल्याचे तपासातून समोर आले होते.