शिक्षण ः कोविड आणि उपाय

0
44
  • विलास रामनाथ सतरकर
    (मुख्याध्यापक, डॉ. के. ब. विद्यालय, कुजिरा)

इयत्ता १ ली ते ८ वीच्या विद्यार्थ्यांना एकावेळी एक वर्ग किंवा तत्सम पद्धतीने कोविड तत्त्वे पाळून आठवड्यातून किमान एकदा तरी शाळेत बोलवावे अशा प्रकारच्या प्रतिक्रिया बर्‍याच पालकांकडून येत आहेत. मुलांमध्ये शालेय वातावरणात जे संस्कार होतात, जी विविध कौशल्ये मुले वर्गात शिकतात, त्याचेही सार्थक होऊ शकते. त्यामुळे जोपर्यंत कोविड आटोक्यात आहे तोवर अशा प्रकारे ऑनलाईन व ऑफलाईन दोन्ही पद्धतींचा अवलंब केला तर उपयोगी ठरू शकते.

मार्च २०२० पासून जवळजवळ दीड वर्ष शाळा-विद्यालये बंद आहेत. साल २०२०-२१ हे ऑनलाइन शिक्षणपद्धतीने पार पडले. ज्यावेळी सर्वकाही बंद होते, अशावेळी शैक्षणिक प्रक्रिया अविरत चालू ठेवण्यास ऑनलाइन पद्धती संकटमोचक होऊन मदतीला आली आणि शैक्षणिक प्रक्रिया सुरू राहिली. गेल्या वर्षी एप्रिलनंतर कोविडची दुसरी लाट आल्याने इ. १० वी व १२ वीच्या परीक्षा होऊ शकल्या नाहीत, त्यामुळे इंटरनल मार्कस् गृहीत धरून १० वी व १२ वीचे बोर्डचे निकाल लावण्यात आले.
एप्रिल २०२१ पासून सुरू झालेली दुसरी लाट फार मोठे उग्ररूप घेऊन आल्याने ती ओसरायला बराच काळ गेला आणि अजूनही धोका पूर्णपणे टळलेला नाही. त्यातच तिसरी लाट येण्याचे संकेत तज्ज्ञमंडळी देत आहेत.

या सर्व पार्श्‍वभूमीवर यंदाही शाळा ऑनलाइन पद्धतीनेच चालवावी लागणार का? अशा प्रकारचा चिंतेचा सूर सर्वत्र दिसतो आहे. ऑनलाइन शिक्षणपद्धती ही तात्पुरती व्यवस्था होती. मुले घरी असल्याने त्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून तोच एक योग्य पर्याय होता; आणि तो सर्व विद्यार्थी, शिक्षकवर्गाने आत्मसात करून घेतला.
परंतु अशी तात्पुरती व्यवस्था दीर्घकाळ चालू राहिली तर त्यामुळे मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ शकते, असा निष्कर्ष शिक्षणतज्ज्ञ काढू लागले आहेत. देशातील एका अग्रगण्य संस्थेने यासंदर्भात एक सर्वेक्षण केले आहे, त्याचे निकाल फार काळजी करण्यासारखे आहेत. या संस्थेच्या शैक्षणिक सर्वेनुसार मुलांची आकलनशक्ती कमी होत चालली आहे. तसेच मुले बर्‍याच गोष्टी विसरल्याचेही यात आढळून आले आहे. या सर्वेक्षणानुसार मुलांची भाषा विषयाची प्रगती खुंटली आहे. मुलांचे वाचन कमी झाले असून सृजन लेखनातही मुले कमी पडायला लागली आहेत. भाषा विकास हा शिक्षणाचा महत्त्वाचा भाग, पण त्यातच बहुसंख्य मुले मागे पडत असल्याने फार मोठी चिंता व्यक्त होत आहे. मुलांमध्ये संवादकौशल्याचा अभाव जाणवू लागला आहे. ज्या पद्धतीने मुलांचा वर्गात संवाद होत असतो तसा ऑनलाइन शिक्षणपद्धतीमध्ये तितका प्रभावी होऊ शकत नाही म्हणून संवादकौशल्य विकसित होण्यात मुले कमी पडत आहेत. भाषेबरोबरच गणित विषयातही मुलांची प्रगती कमी असल्याचे या सर्वेक्षणाचे निष्कर्ष आहेत. बर्‍याच अंशी मुले वर्गात शिकविलेल्या गोष्टी विसरल्याचे व बर्‍याच संकल्पना (कॉन्सेप्ट), मूलभूत सिद्धांत मुलांना व्यवस्थित न समजल्याचेही या सर्वेक्षणात आढळून आले आहे.
याव्यतिरिक्त मुलांचे मानसिक स्वास्थ्य बिघडल्याचीही बरीच उदाहरणे वर्तमानपत्रांतून वाचनात येतात. मोबाईल आणि इतर उपकरणांच्या आहारी मुले जात असून त्याचे दुष्परिणामही आगामी काळात दिसू लागतील अशी भीती व्यक्त होत आहे. घरी बसून मुलांमध्ये चिडचिड वाढल्याचीही खूप उदाहरणे आहेत.

मित्र नसल्याने मुलांची घुसमट होत आहे. शाळेत मित्रांबरोबर वावरताना मुलांच्या सामाजिक कौशल्याचा विकास होत असतो. एकत्र मिळून-मिसळून राहणे, एकमेकांबरोबर खाऊ वाटून खाणे, एकमेकांस समजून घेणे, मदत करणे, अशा विविध पैलूंचा विकास हा शालेय जीवनात होत असतो. मुले शाळेत न आल्याने या सर्व गोष्टींचा अभाव त्यांच्या भवितव्यावर फार मोठा परिणाम करणार आहे. एकमेकांच्या सहकार्याने आत्मसात केलेल्या शिक्षणाचा अभाव जाणवणार आहे. दुसर्‍याशी आपण कसे जुळवून घेतले पाहिजे हेसुद्धा मुलांना समजणार नाही. त्यामुळे सामाजिक कौशल्यामध्ये एक विद्यार्थी म्हणून ते मागे पडू शकतील ही भीतीही जाणवते. आताची ही पिढी पाहता संकुचित वृत्ती, भावनाशून्यता अशा अनेक गोष्टी त्यांच्यात पुढे जाणवण्याची शक्यता आहे. मुलांच्या गुणवत्तेचा विचार करता आयुष्यात पुढे येणार्‍या स्पर्धात्मक परीक्षांमध्ये ही मुलं मागे पडण्याचीही शक्यता नाकारता येत नाही.

गेल्या दीड वर्षात ऑनलाइन पद्धतीने सुरू असलेल्या शिक्षणाचे तसे फायदेही आहेत. गोव्यातील सर्व शिक्षक ऑनलाइन वर्ग घेण्यात तरबेज झाले आहेत. तसेच बर्‍याच शिक्षकांनी या ऑनलाइन पद्धतीमुळे स्वतःला ‘अपडेट’ केलेले आहे. एकेकाळी ज्यांना ऑनलाइन या संकल्पनेची भीती वाटायची, असे शिक्षक आज पूर्णपणे तंत्रज्ञानामध्ये पारंगत झालेले दिसतात. यासाठी सर्व शिक्षक कौतुकास पात्र आहेत. आपले स्वतःचे व्हिडिओ तयार करून आपला विषय विद्यार्थ्यांपर्यंत खूप साध्यासोप्या पद्धतीने पोचवावा यासाठी तळमळणारे शिक्षकही आहेत. त्यामुळे या ऑनलाइन पद्धतीने शिक्षकांमधील आत्मविश्‍वास नक्कीच वाढलेला दिसून येतो.

ऑनलाइन शिक्षणपद्धतीमुळे फक्त शाळेच्या वेळातच नाही तर बर्‍याच शाळांमध्ये संध्याकाळी उशिरापर्यंत वर्ग घेतले जातात. मुलांना तसेच शिक्षकांना देशभरातील विविध तज्ज्ञांचे मार्गदर्शन लाभले. शिक्षकांना देशभरातील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय शैक्षणिक परिसंवादात भाग घेता आला. घरबसल्या विविध तज्ज्ञांशी संवाद करण्याची संधी यानिमित्ताने लाभली. त्यामुळे कोविडचे संकट गेल्यानंतरही ज्यावेळी शाळा नियमित सुरू होणार, त्यावेळीसुद्धा या सर्व नवीन शिकलेल्या गोष्टींचा निश्‍चितच उपयोग होणार आहे.
शिक्षण खात्याकडून इ. ९ वी ते १२ वीच्या ऑफलाइन परीक्षा घेण्यासंबंधीचे परिपत्रक आलेले आहे. कोविडसंदर्भातील मार्गदर्शक तत्त्वे पाळण्याचे निर्देश या परिपत्रकात देण्यात आले आहेत.

गेल्या वर्षी नोव्हेंबर ते मार्चपर्यंत याच पद्धतीने इ. ९ ते १२ वीचे वर्ग चालले होते. बर्‍याच शाळांनी ऑनलाइन व ऑफलाइन या दोन्हीही पद्धतींचा अवलंब करून शाळा चालवल्या होत्या. ५० टक्के मुले (विद्यार्थी) शाळेत आणून मुलांशी प्रत्यक्ष संवाद साधत. चार-पाच महिने मुलांना शाळेत आणले होते. काही शाळांनी इ. ९ वी व ११ वीच्या परीक्षाही ऑफलाइन पद्धतीने घेतल्या होत्या.

तीच पद्धत वापरून या वर्षीही शाळा-विद्यालये उघडण्यासंबंधीचे सकारात्मक पाऊल शिक्षण खात्याने उचलेले आहे. इ. ९ वी ते १२ वीच्या मुलांना परीक्षेसाठी शाळांमध्ये बोलावण्याची मुभा विद्यालयांना दिलेली आहे. त्यामुळे याचा योग्य तो उपयोग शालेय व्यवस्थापन, मुख्याध्यापक व शिक्षकवर्ग करून घेणार. याच पद्धतीने कोविडसंदर्भातील सर्व नियम पाळून इतर वर्गांतील मुलांना आवश्यकतेनुसार शाळेत बोलावण्याची मुभा शाळा व्यवस्थापनाला दिली तर मुलांची भविष्यातील मानसिकता स्वथ्य राखण्यात फार मदत होणार आहे.

इयत्ता १ ली ते ८ वीच्या विद्यार्थ्यांना एकावेळी एक वर्ग किंवा तत्सम पद्धतीने कोविड तत्त्वे पाळून आठवड्यातून किमान एकदा तरी शाळेत बोलवावे अशा प्रकारच्या प्रतिक्रिया बर्‍याच पालकांकडून येत आहेत. मुलांमध्ये शालेय वातावरणात जे संस्कार होतात, जी विविध कौशल्ये मुले वर्गात शिकतात, त्याचेही सार्थक होऊ शकते. त्यामुळे जोपर्यंत कोविड आटोक्यात आहे तोवर अशा प्रकारे ऑनलाईन व ऑफलाईन दोन्ही पद्धतींचा अवलंब केला तर उपयोगी ठरू शकते.

तसेच शालेय पालक-शिक्षक संघाच्या, स्वयंसेवकांच्या मदतीने मार्गदर्शक तत्त्वे पाळण्यासाठी शाळांना सहकार्य करण्यास एक गट प्रत्येक विद्यालयाने तयार करणे व मुलांना कोविडची बाधा होणार नाही यासाठी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.
ऑफलाईन पद्धतीने शाळा सुरू व्हावी अशी विद्यार्थी, शिक्षक, पालक तसेच समाजातील अनेक लोकांची इच्छा आहे. ‘इच्छा तिथे मार्ग’ असे म्हटले जाते. आम्ही सर्वांनी मिळून यासंबंधी मार्ग शोधला पाहिजे. ऑफलाईन व ऑनलाईन या दोन्हींचा मेळ घालून शिक्षणप्रणाली आपण चालू ठेवू शकतो. ऑफलाईनचा विरोध फक्त ‘विरोध करावा’ म्हणून करणे चुकीचे आहे. सर्व एसओपीचं पालन करून व आवश्यक सावधगिरी बाळगून विद्यालये सुरू करावीत व दोन्ही ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने शैक्षणिक प्रक्रिया चालू ठेवावी. हा प्रयोग यशस्वी होण्यासाठी पालक, शाळा व्यवस्थापन, शिक्षक व समाज यांनी एकत्रितपणे काम करणे आवश्यक आहे. आजच्या विद्यार्थ्यांवर ‘कोविड बॅच’ हा ठपका पडू नये व ते कुठेही मागे पडू नयेत याची सर्व घटकांनी काळजी घेणे आवश्यक आहे. आणि म्हणूनच शिक्षण खात्याच्या ऑफलाईन वर्ग सुरू करण्याच्या निर्णयाचे सर्वांनी स्वागत करूया व परत एकदा शाळा परिसर विद्यार्थ्यांच्या किलबिलाटात फुलवूया…