- अंजली आमोणकर
धुमधडाक्यात नवरात्री उत्सव साजरा केल्यानंतर दहाव्या दिवशी येतो दसरा म्हणजेच विजयादशमी. दसर्याच्या दिवशी गावाच्या सीमा ओलांडून जाण्याची प्रथा प्रचलीत आहे. लोक या दिवशी परस्परांना सोने म्हणून आपट्याची पाने देतात. स्वतःसमवेत इतरांचाही विचार करण्यास शिकवणारा दसरा सण आहे. वाईटावर चांगल्याचा विजय, असत्यावर सत्याचा विजय म्हणजे दसरा.
अश्विन शुक्ल पक्षाच्या प्रतिपदेपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात होते. हा हिंदूंचा एक अतिशय महत्त्वाचा व शुभ सण आहे. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवी दुर्गेची प्रतीमा किंवा मूर्ती स्थापून घटस्थापना केली जाते व नवरात्रीच्या सणाचा प्रारंभ होतो. हा उत्सव आपल्या समाजात इतक्या विविधरंगी प्रकारे साजरा केला जातो की ते पाहून थक्क व्हायला होते!! या दरम्यान येणारा पितृपंधरवडा नवरात्रीच्या तयारीत कसा संपतो कळतही नाही.
नवरात्र सुरू झाल्यावर अजूनही अनेकजण नऊ दिवस उपवास करतात. काही घरांमध्ये तसेच मंडळांमध्ये देवीचा गोंधळही घातला जातो. अनेक ठिकाणी घटावर फराळाचा फुलोरा बांधतात. देवीने नवरात्रीचे नऊ दिवस भीषण युद्ध करून अनेक दैत्यांचा संहार केला आणि महिषासुराचा वध केला; म्हणून या देवीचे नाव ‘महिषासुरमर्दिनी’ असे रूढ झाले. तेव्हापासून पृथ्वीवर महिषासुरमर्दिनीच्या शक्ती रुपाची पूजा नवरात्रात केली जाते. वाघावर आरूढ झालेली, हातात तलवार, खड्गं ही शस्त्रे धारण केलेली आकर्षक अशी देवीची मूर्ती नवरात्रीत सगळीकडे पूजली जाते. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पाटावर तांदळाचा हत्ती काढून, त्याभोवती फेर धरून भोंडला खेळला जातो. ‘‘ऐलमा – पैलमा, गणेश देवा, माझा खेळ मांडू दे, करीन तुझी सेवा’’, या गाण्यानं भोंडल्याची सुरुवात होते. खिरापती करून त्या ओळखणे हा मजेचा भागही भोंडल्यात असतो. विदर्भात ‘भुलाबाई’ हा प्रकार सर्वांना बघायला मिळतो. शंकरपार्वतीच्या मूर्ती स्थापून त्यांसमोर टिपर्या खेळल्या जातात. भुलाबाईंनाच ‘गौराई’ असेही म्हटले जाते. कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी नऊ महिन्याची नऊ फळे पिकतात व शेवटी गौराईचे डोहाळे- ‘तिला नेऊनी घाला पलंगावरी, तेथे शंकर बसले. शंकर आमचे मेहुणे, दीड दिवसांचे पाहुणे…’ असे गीत गाऊन उत्सवाची सांगता होते.
देवीच्या साडेतीन पीठांपैकी एक कोल्हापूरची अंबाबाई, दुसरी तुळजाभवानी आणि तिसरी रेणुकामाता ही तीन पूर्ण पीठे आणि यानंतर नाशिक- वणीचे सप्तश्रुंगी हे मंदिर अर्धपीठ मानले जाते. या सर्व ठिकाणी नवरात्रोत्सव फार धूमधडाक्यात साजरा केला जातो.
नवरात्रीच्या नऊ दिवसांत देवीची जी नऊ रुपं पूजली जातात ती सर्व आपल्याला मनोविकार, पापवासना, दुष्टबुद्धी या सार्यांपासून दूर जाण्याचा निर्धार शिकवतात.
भगवतीच्या पहिल्या रुपाला ‘शैलपुत्री’ म्हटले जाते, तर दुसर्या रुपाला ‘ब्रह्मचारिणी’, तिसर्या रूपाला ‘चंद्रघंटा’, चौथ्याला ‘कूष्मांडा’, पाचव्याला ‘स्कंदमाता’, सहाव्याला ‘कात्यायनी’, सातव्याला ‘कालरात्री’, आठव्याला ‘महागौरी’ व नवव्याला ‘सिद्धिदात्री’ असे म्हटले जाते. दहाव्या दिवशी ती ‘शुंभनिशुंभ’ या राक्षसांचा वध करण्याकरता सामर्थ्य मिळवायला सीमोल्लंघन करते.
श्रीकृष्णाने भगवद्गीतेत वर्णन केल्याप्रमाणे यज्ञ केल्यास आणि त्याठिकाणी पर्जन्यवृष्टी झाल्यास त्या यज्ञाचे फळ शतपटीने वाढते, म्हणतात. तसेच ज्या कुमारिकांना भोजन दिले जाते त्यांनासुद्धा त्यांच्या वयानुसार, देवीच्या वेगवेगळ्या नावांनी संबोधित केले जाते. कुमारिका म्हणजे वय वर्षे दोन ते दहामधील मुली. तीन वर्षांच्या कुमारिकेला त्रिमूर्ती, चार वर्षाच्या कुमारिकेला कल्याणी, पाच वर्षाच्या कुमारिकेला रोहिणी, सहा वर्षांच्या कुमारिकेला कालिका, सात वर्षांच्या कुमारिकेला चंडिका, आठ वर्षांच्या कुमारिकेला शांभवी, नऊला दुर्गा व दहा वर्षाच्या कुमारीकेला सुभद्रा म्हटले जाते.
कुमारीपूजनाचे फळ असे आहे की आपल्या आयुष्यातील दुःख आणि दारिद्य्र नष्ट होऊन आपल्या शत्रुंचा सर्वनाश होतो. यावरून भारतीय संस्कृतीमध्ये स्त्रीचे महत्त्व किती आहे हेही अधोरेखित होते.
श्रीसप्तशतीरचयिता मार्कंडेय ऋषी म्हणतात –
‘‘सर्वाबाधा विनिर्मुक्तो धनधान्य सुतन्वितः|
मनुष्यो मत्प्रसादेन भविष्यति न संशयः॥
- जो कोणी भक्त नवरात्रीमध्ये या भगवतीची मनापासून उपासना करेल, त्याला कुठलीही बाधा होणार नाही आणि त्याला या जन्मात धनधान्याची प्राप्ती होईल, यात काही शंका नाही.
पूर्व भारतात बंगाल व पश्चिम भारतात गुजराथमध्ये नवरात्र हा दिवाळीपेक्षाही मोठा सण असतो. महाराष्ट्रात जसे दिवाळी अंकाचे बस्तान बसले आहे तसेच बंगाल व आंध्र प्रदेश व तेलंगणात दुर्गापूजेच्या निमित्ताने विशेषांक निघतात. आज बंगालमध्ये पूजाआनंद व इतर तीन प्रकाशनांच्या मिळून साडेतीन लाख प्रती छापल्या जातात. कर्नाटक व गुजराथमध्येही दूर्गापूजा विशेषांक छापले जातात. उत्तम साहित्याची ही मेजवानीच असते.
पश्चिम भारतात गुजराथ राज्यात नवरात्री उत्सवात ‘गरबा’ खेळण्याला खूप महत्त्व आहे. प्रत्येक शहराचा वेगळा असा गरबा खेळला जातो. गरबा किंवा ‘गर्भा’ म्हणजेच देवीचा गर्भ – मातीपासून तयार केलेल्या कलशाला म्हणजेच घटाला गरबा म्हणतात. त्याला सुंदर रंगरंगोटी करून त्यात दिवा पेटवतात व टिपर्या घेऊन आकर्षक गरबा नृत्य केले जाते.
उत्तर भारतात ‘नवरात्र’ हा उत्सव प्रभुरामचंद्रांचा विजय म्हणून साजरा केला जातो. उत्तर भारतात रामाने रावणाचा वध केला होता. नऊ दिवस ‘रामलीला’चे रंगमंचीय आविष्कार होताना दिसतात व दसर्याच्या दिवशी ‘रावण वध’ करून या उत्सवाची सांगता केली जाते. उत्तर भारतात रावण व कुंभकर्णाच्या प्रतिमांचे दहन विजयादशमीच्या दिवशी केले जाते. नवरात्रीच्या आठव्या दिवशी कन्यापूजन करण्याचा रिवाज उत्तर भारतात आहे. त्यांना देवी मानून त्यांची पूजा केली जाते. त्यांना भेटवस्तू दिल्या जातात. नवरात्रीचे नऊही दिवस पूजा, हवन, यज्ञ, उपवास, भोग- प्रसाद- आरत्या, गायन- वादन- नृत्यांचे जलसे व रामलीलाचे प्रयोग यांची रेलचेल असते.
दक्षिण भारतात नवरात्रीचे नऊ दिवस पुराण आधारित नाट्य, महाकाव्य, नृत्य, यक्षगान सादर केले जाते. दक्षिण भारतातील प्रत्येक घरात बाहुल्यांची प्रदर्शने भरवली जातात. म्हैसुर येथे रस्त्यावरून चामुंडा देवीची भव्य अशी मिरवणूक काढली जाते. या सणाला म्हैसुर दसरा असेही म्हणतात.
‘नवरात्र’ उत्सवामागे जी वैज्ञानिक कारणं आहेत ती म्हणजे दोन ऋतूंचं मीलन या सणात होतं. ऋतु बदलतो त्यावेळी साधारणतः शरीरात वात, कफ, पित्त वाढीस लागतात. त्यामुळे शरीरातील प्रतिकारशक्ती क्षीण होते. त्यामुळे जेव्हा नऊ दिवस उपवास, होम, हवन, पूजा करून देह व वातावरण शुद्धी होते तेव्हा आपोआपच अनेक रोगांपासून आपला बचाव होतो.
नवरात्रीत जी कामं करण्याची मनाई आहे त्यात बहुत करून – दिवसा झोपू नये, नखं व केस कापू नये, देवीला अन्नाचा नैवेद्य दाखवू नये, घराला टाळा लावू नये, तामसिक आहार टाळावा, या दिवसात घरात येणार्या कोणत्याही कन्येस रिकाम्या हाती पाठवू नये, व्रत ठेवणार्याने कात्री वापरू नये…
अशा रीतीने धुमधडाक्यात नवरात्री उत्सव साजरा केल्यानंतर दहाव्या दिवशी येतो दसरा म्हणजेच विजयादशमी. विद्येची देवता मानल्या गेलेल्या सरस्वती देवीचे पूजन या दसर्याच्या दिवशी विशेषत्वाने केले जाते. दसर्याच्या दिवशी गावाच्या सीमा ओलांडून जाण्याची प्रथा प्रचलीत आहे. लोक या दिवशी परस्परांना सोने म्हणून आपट्याची पाने देतात. सायंकाळी गावाची सीमा ओलांडून ईशान्येस जायचे; शमीच्या किंवा आपट्याच्या झाडाची पूजा करायची, तेथे अष्टदळ रेखाटून त्यावर अपराजिता देवीची स्थापना करायची आणि तिला प्रार्थना करायची की मला विजयी कर. त्यानंतर योद्ध्यांनी शस्त्रपूजन, व्यापार्यांनी व्यापारासाठी प्रयाण व विद्यार्थ्यांनी सरस्वतीपूजन करायचे अशी प्रथा होती. मुले पाटीवर सरस्वतीचे प्रतिकात्मक चित्र काढून त्या पाटीची पूजा करतात. पुस्तकांची आणि वह्यांचीही पूजा होते.
प्रारंभी हा कृषीविषयक लोकोत्सव होता. पेरलेल्या शेतातील पहिले पीक यावेळी घरात येई. त्यावेळी शेतकरी हा उत्सव करीत असत. ग्रामीण भागात शेतीतील तुरा आपल्या फेट्यात लावण्याची पद्धतीही प्रचलीत आहे. साडेतीन मुहूर्तातील एक मुहूर्त मानल्या गेलेल्या विजयादशमीला शुभ कार्ये सुरू करतात. नवीन वाहने, वास्तू तसेच कपड्यांची खरेदी व सोने खरेदी होते.
श्रीरामाने विजयादशमीच्या दिवशी रावणाचा वध केला अशी आख्यायिका प्रचलीत आहे. या दिवशी पांडव, अज्ञातवास संपवून परत निघाले अशीही आख्यायिका आढळून येते. पांडवांनी अज्ञातवासात जाण्यापूर्वी आपली शस्त्रे शमीच्या झाडावर एका ढोलीत लपवून ठेवली होती. त्यापैकी गांडीव धनुष्य आणि काही बाण बृहन्नडेच्या रूपात असलेल्या अर्जुनाने विराटाच्या गाई सोडवून आणण्यासाठी वापरले आणि त्या कामगिरीनंतर परत झाडावर ठेवून दिले- अशी कथाही आढळून येते. त्यामुळे विजयादशमीला शमीची पूजा करून त्याला औषध केले जाते.
विजयादशमीला ज्या वृक्षाची पाने लुटली जातात त्या वृक्षाला अश्मंतक असे म्हणतात. ही पाने पित्त व कफ दोषांवर गुणकारी आहेत.
भारतात विविध प्रांतात विविध तर्हेने दसरा मनवतात. उत्तर भारतात हिमालयाच्या कुशीत ‘कुलू’ घाटीत दसर्याचा उत्सव सात दिवस साजरा होतो. यावेळी रघुनाथाची यात्रा केली जाते. रावणाचा मोठा पुतळा उभारून त्याचे दहन करतात.
गुजराथमध्ये सोमनाथ व द्वारका येथे दसरा साजरा होतो. दसर्याला जुनागढ संस्थानातील देवीची ब्राह्मण पुरोहिताच्या हस्ते पूजा केली जाते. छत्तीसगडमधील बस्तर याठिकाणी अडीच महिने दसरा साजरा होतो. हा उत्सव दंतेश्वरी या देवतेचा उत्सव मानला जातो. शेतीतीव लोखंडी अवजारांची पूजा करण्याची पद्धत आहे. घराला आंब्याच्या पानांचे आणि झेंडूच्या फुलांचे तोरण लावतात. दसर्याला झेंडूच्या फुलांनी पूजा करण्याची प्रथा आहे. यंत्रे, वाहने यांना झेंडूच्या फुलांच्या माळा घालतात. दक्षिण भारतात, आंध्रप्रदेश, तामिळनाडू, कर्नाटक येथे नऊ दिवसांत दर तिसर्या दिवशी देवीच्या एकेका रूपाची पूजा केली जाते. पहिले तीन दिवस लक्ष्मी, नंतरचे तीन दिवस सरस्वती आणि शेवटचे तीन दिवस दुर्गेची पुजा केली जाते. म्हैसुर येथील दसरा जगभरात प्रसिद्ध आहे.
आंध्रप्रदेश येथील विजयवाडा येथील इंद्रकिलाद्री पर्वतावर कनकदुर्गा मंदिर आहे. येथे शारदीय नवरात्रोत्सव साजरा केला जातो. त्याजोडीने दसर्याच्या दिवशी देवीला हंसाच्या आकाराच्या होडीत बसवून कृष्णा नदीत फिरवून आणले जाते. याला थेपोत्सवम् असे म्हटले जाते. तसेच मंदिरात आयुधपूजाही होते.
फार वर्षांपूर्वी वरतंतू नावाचे ऋषी होऊन गेले. त्यांच्याकडे विद्याभ्यासासाठी खूप विद्यार्थी येत. त्यावेळी मानधन वा फी नव्हती. त्यामुळे शिक्षण संपल्यावर विद्यार्थी गुरुदक्षिणा देत. या ऋषींकडे कौत्स नावाचा एक शिष्य होता. त्याचे शिक्षण पूर्ण झाल्यावर गुरुंनी त्याला घरी जाण्याची परवानगी दिली. त्याने ऋषींना गुरुदक्षिणेत काय देऊ, असे विचारले. तुम्ही मागाल ते मी देईन. ऋषींनी कौत्साची परीक्षा घेण्याचे ठरवले. त्याने कौत्साला प्रत्येक विद्येबद्दल एक कोटी सुवर्णमुद्रा याप्रमाणे चौदा विद्यांबद्दल चौदा कोटी सुवर्णमुद्रा आणावयास सांगितले. कौत्स हे ऐकून गांगरून गेला. तो रघुराजाकडे गेला. परंतु राजाने त्याचवेळी विश्वजीत यज्ञ केल्यामुळे खजिना संपला होता. तरीसुद्धा राजाने कौत्साकडे तीन दिवसांची मुदत मागितली आणि त्याने इंद्रावर स्वारी करण्याचे निश्चित केले. इंद्राला रघुराजाचा पराक्रम माहीत होता. त्याने कुबेराला सारी हकीकत सांगितली. इंद्राने आपट्याच्या पानाची नाणी बनवून ती पावसासारखी राजवाड्यात पाडली. कौत्स त्या मुद्रा घेऊन ऋषींकडे गेला व गुरुदक्षिणा घेण्याची विनंती केली. उरलेल्या मुद्रा आपट्याच्या झाडाखाली ठेवून त्या लोकांना लुटायला सांगितल्या. लोकांनी त्या वृक्षाची पूजा केली व पाहिजे तितक्या मुद्रा लुटल्या. तो दिवस दसर्याचा होता म्हणून त्या दिवसापासून या झाडाची पूजा करून सोन्याची पाने लुटण्याची प्रथा सुरू झाली.
‘‘साधुसंत येती घरा, तोचि दिवाळी दसरा’’- या तुकाराम महाराजांच्या उक्तीत दोन सणांचा अजोड असा उल्लेख आहे. स्वतःसमवेत इतरांचाही विचार करण्यास शिकवणारा दसरा सण आहे. वाईटावर चांगल्याचा विजय, असत्यावर सत्याचा विजय म्हणजे दसरा.