कोरडा कचरा साठविण्यासाठी पणजी मनपाला हवी जागा

0
132

>>म्हणून स्वच्छतेत पिछाडी : महापौर फुर्तादो
कोरडा कचरा साठवून ठेवण्यासाठी पणजी महापालिकेला जागा हवी असून ती सरकारने उपलब्ध करून दिल्यास शहरात विविध ठिकाणी साठलेला कोरडा कचरा हलवणे शक्य होणार असल्याचे महापौर सुरेंद्र फुर्तादो यांनी काल सांगितले.
स्वच्छ शहराच्या स्पर्धेत पणजी मागे पडल्याच्या पार्श्‍वभूमीवर काल या प्रतिनिधीने सुरेंद्र फुर्तादो यांच्याशी संपर्क साधला असता सुका कचरा ही पणजीसाठी डोकेदुखी ठरली असल्याचे ते म्हणाले. झाडाची वाळलेली पाने तसेच कापलेल्या अथवा मोडून पडलेल्या फांद्या तसेच अन्य कोरडा कचरा उचलून साठवून ठेवण्यासाठी पणजी महापालिकेकडे जागा नाही. त्यामुळे तो गोळा करता येत नसल्याचे फुर्तादो यानी स्पष्ट केले.
परराज्यातून येणारे कामगार व अन्य छोटी मोठी कामे करून उदरनिर्वाह करणारे लोक हे उघड्यावर प्रातर्विधी करतात तसेच कचराही टाकून देतात. या कारणामुळेही शहराच्या स्पर्धेत पणजी मागे पडल्याचे फुर्तादो म्हणाले. परराज्यातून येणारे कामगार पणजी व आसपासच्या गावात खोल्या भाड्याने घेऊन राहतात. या बहुतेक खोल्यांत शौचालये नसतात. त्यामुळे हे लोक उघड्यावर शौच करतात, असे फुर्तादो म्हणाले. करंजाळे, ताळगांव, बोक-द-व्हाक, सांतइनेज, भाटले आदी भागांत हे प्रकार वाढले असल्याचे फुर्तादो म्हणाले. पणजीचे आमदार सिध्दार्थ कुंकळ्येकर यानीही तशीच प्रतिक्रिया व्यक्त केली. परराज्यांतून कामाच्या शोधात येथे येणारे कामगार मिळेल तेथे बेकायदेशीरपणे घरे बांधून राहतात. घरात शौचालये नसल्याने हे लोक उघड्यावर शौच करतात. त्यामुळे सर्वत्र दुर्गंधी व घाण पसरते, असे सांगून स्वच्छ शहराच्या स्पर्धेत पणजी मागे पडल्यास तेच एक कारण असल्याचे कुंकळ्येंकर यांनी स्पष्ट केले.

‘परप्रांतीय कामगार मिळेल तेथे बेकायदेशीर घरे बांधतात. शौचालय नसल्याने उघड्यावर प्रातर्विधी उरकतात. त्यामुळे घाण व दुर्गंधी’
आमदार सिध्दार्थ कुंकळकर