९० हजार एलईडींचे काम लवकरच पूर्णत्वास

0
99

येत्या १५ जूनपर्यंत राज्यभरात आणखी ९० हजार एल्‌ईडी पथदीप बसवण्याचे काम पूर्ण होणार असल्याची माहिती वीजमंत्री पांडुरंग मडकईकर यांनी काल या प्रतिनिधीशी बोलताना दिली.
हे पथदीप बसवण्याचे काम पुणे येथील एका कंपनीला देण्यात आलेले असून त्यांची ५५ पथके हे पथदीप बसवण्याचे काम करीत असल्याचे मडकईकर यांनी सांगितले. यापूर्वीच राज्यभरात सुमारे ९० हजार एल्‌ईडी पथदीप बसवण्यात आले असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.
भूवाहिन्यांसाठी
लवकरच निविदा
दरम्यान, मडगांव, पणजी, वास्को या शहरांतील काही भागांत भूमीगत वीजवाहिन्या घालण्याचे काम शिल्लक आहे. हे काम पूर्ण करण्यासाठी तसेच राज्यातील किनारपट्टी भागांत भूमीगत वीज वाहिन्यां घालण्यासाठीचे काम हाती घ्यायचे असून त्यासाठी येत्या १५ दिवसांत निविदा काढण्यात येणार असल्याचेही मडकईकर यांनी स्पष्ट केले.
एल्‌ईडी पथदीप व भूमीगत वीज वाहिन्या घालण्याच्या कामाला आपण प्राधान्य दिले असल्याचे त्यांनी सांगितले.