>> केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे नागरिकांना आवाहन
देशात कोरोनाची दुसरी लाट ओसरत असतानाच केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने काल एका पत्रकार परिषदेद्वारे सणासुदीच्या काळात काळजी घेण्याचे आवान केले आहे. यंदाही गणेशोत्सव, दसरा-दिवाळी हे सण कोरोना नियमांचे पालन करत साजरे करा असे आवाहन करण्यात आले आहे. लसीकरण झाल्यानंतरही मास्क आणि कोरोनाचे नियम पाळणे अत्यावश्यक असल्याचे काल आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी सांगितले.
कोरोना रुग्णांची संख्या सणासुदीनंतरच वाढते. त्यामुळे सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यातील सण जबाबदारीने साजरे करावेत असे आवाहन सचिव भूषण यांनी केले आहे. लसीकरणामुळे रोगाची तीव्रता कमी होते. त्यामुळे लसीकरणानंतरही मास्क आणि कोरोना नियम पाळणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. सध्या देशात रोज येणार्या कोरोनाबाधितांत केरळमधून ५१ टक्क्यांहून अधिक रुग्ण असल्याचे आरोग्य मंत्रालयाने सांगितले.
ऑक्टोबरपासून १२ वर्षांवरील
मुलांना कोरोना प्रतिबंधक लस
देशातील १२ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलांना ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापासून कोरोना लस मिळणार आहे. त्यामुळे भारतातील लसीकरण मोहिमेला आता आणखी वेग येणार आहे. देशात या वयोगटातील मुलांची संख्या १२ कोटींपर्यंत आहे. ही लस सर्वप्रथम गंभीर आजाराशी झुंज देणार्या मुलांना दिली जाईल. डीसीजीआयकडून यासाठीची परवानगी मिळाली असून ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापासून मुलांना झायडस कॅडिला ही लस देण्यात येणार आहे.
सरकारच्या कोविड१९ वर्किंग ग्रुप समितीचे प्रमुख डॉ. एन. के. अरोरा यांनी याबाबत माहिती दिली. ते म्हणाले की, भारतात १२ ते १७ वयोगटात सुमारे १२ कोटी मुले आहेत. त्यात १ टक्क्यांपेक्षा कमी मुलांना आरोग्य समस्या असू शकतात, असा अंदाज आहे.
देशात १८ वर्षांखालील सुमारे ४४ कोटी मुले आहेत. मुलांच्या भविष्यासाठी त्यांच्या बौद्धिक विकासासाठी शाळा पुन्हा सुरू करणे अत्यंत आवश्यक असल्याचे सांगितले. मुले शाळेत जाऊ शकतात. परंतु त्यांना लसीकरणाची गरज नाही. पण ती सुरक्षित असायला हवी. म्हणूनच त्यांचे पालक आणि शाळेतील शिक्षक व इतर कर्मचारी यांचे लसीकरण पूर्ण झाल्याची खात्री करायला हवी असे डॉ. अरोरा यांनी, सांगितले. तर १२ ते १७ वयोगटाील निरागी मुलांना मात्र लसीसाठी मार्च २०२२पर्यंत थांबावे लागेल असेही त्यांनी सांगितले.
दोन डोसमधील अंतर कमी होणार
देशात कोरोना प्रतिबंधक लशीच्या दोन डोसमधील अंतर आता पुन्हा बदलणार आहे. लशीच्या दोन डोसमधील अंतर आता पुन्हा कमी केले जाणार आहे. कोविशिल्डच्या दोन डोसमधील अंतर कमी करण्याबाबत सरकारने विचार केला आहे, अशी माहिती सरकारच्या सूत्रांनी दिली आहे. जेव्हा कोरोना लशीच्या दोन डोसमधील अंतर वाढवून जास्तीत जास्त १६ आठवडे करण्यात आले, तेव्हा देशात लशीचा तुटवडा होता. आता देशात सहा कंपन्यांच्या लशींना परवानगी मिळाली आहे. दोन डोसमधील अंतर कमी झाल्यास लसीकरणही मोठ्या प्रमाणात होईल. आणि कोरोना रुग्णांना गंभीर होण्यापासून किंवा रुग्णालयात दाखल होण्यापासून दूर ठेवता येईल असे सांगण्यात आले.