>> मुख्यमंत्र्यांनी शक्यता फेटाळली
सध्याच्या गोवा विधानसभेचा कार्यकाळ संपण्यापूर्वीच विधानसभा निवडणूक घेण्याची शक्यता काल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी फेटाळून लावली. मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी गोवा विधानसभेची निवडणूक फेब्रुवारी २०२२ लाच होणार असल्याचे काल स्पष्ट केले.
काल एका शिक्षणविषयक परिषदेतून बोलताना मुख्यमंत्री सावंत यांनी वरील स्पष्टीकरण केले. राज्य विधानसभेची निवडणूक ही ह्या विधानसभेचा कार्यकाळ संपण्यापूर्वीच घेण्यात येणार नसल्याचे सांगून ती निवडणूक फेब्रुवारी २०२२ ला घेण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
भाजपने प्रचाराचा शुभारंभ केला आहे. ती विधानसभा निवडणुकीची तयारी आहे हे खरे असले तरी तो पक्षाच्या कार्याचा भाग आहे. मात्र याचा अर्थ विधानसभा निवडणूक मुदतपूर्व होणार असा होत नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले.
खाण महामंडळ प्रक्रिया सुरू
राज्यात खाण महामंडळ स्थापन करण्यासाठीची प्रक्रिया सुरू झाली आहे. राज्यपालांनी एकदा ह्या खाण विधेयकावर सही केली व ते सरकारकडे पाठवून दिले की खाण महामंडळ स्थापन करण्याचा मार्ग मोकळा होणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट या विषयावर बोलताना केले.
राष्ट्रीय शिक्षण धोरण
पुढील वर्षापासून
राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० ची राज्यात पुढील वर्षापासून अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी काल स्पष्ट केले. सर्व संबंधितांना विचारात घेऊनच नव्या शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याची माहिती काल त्यांनी दिली. प्राथमिक स्तरावरील शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांपासून उच्च शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांसह सर्वांचाच ह्या नव्या शैक्षणिक धोरणामुळे फायदा होणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले.