सराफी दुकानाच्या भिंतीला भगदाड पाडून म्हापशात ४ लाखांची चोरी

0
45

गांझा बिल्डिंगमधील सिद्धार्थ सांगोडकर यांच्या मालकीच्या श्री ज्वेलर्स या सराफी दुकानाची भिंत फोडून चोरट्यांनी ४ लाखांची चोरी केली. दुकानाच्या मागच्या भिंतीला भगदाड पाडून दुकानातील ५ किलोहून अधिक चांदीची चोरी करण्यात आली.

मंगळवारी रात्री १२:१५ च्या सुमारास चोरांनी ब्रागांझा बिल्डिंगमधील सी सी टीव्ही कॅमेर्‍याची दिशा बदलून सराफी दुकानाच्या मागच्या भिंतीला भगदाड पाडत दुकानात प्रवेश केला. दुकानात रोख रक्कम तसेच सोन्याचे दागिने नव्हते. मात्र चोरांना ५ किलो चांदी मिळाली. ती त्यांनी लंपास केली. त्याची किंमत चार लाख रुपये होते.

या दुकानामधील सी सी टीव्ही कॅमेरा रात्रीच्यावेळी दुकानमालक बंद करून ठेवत असे. तसेच पालिकेने गांधी चौकमधील सार्वजनिक ठिकाणी लावलेला कॅमेराही नादुरुस्त असल्यामुळे पोलिसांना तपास करण्यास अडचणी येऊ शकतात. या चोरीची माहिती मिळताच उत्तर गोवा पोलीस अधीक्षक शोबीन सक्सेना, उपअधीक्षक गजानन प्रभुदेसाई, पोलीस निरीक्षक तुषार लोटलीकर, गुन्हा अन्वेषण विभागाचे राहुल परब, अपनिरीक्षक सुनील पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली.

उपनिरीक्षक सुनिल पाटील यांनी पंचनामा केला. ब्रागांझा इमारतीच्या दुरुस्तीचे काम करणार्‍या कामगारांना चौकशीसाठी पोलिसांनी बोलावून घेतले आहे. तसेच पोलीस इतर सी सी टीव्ही कॅमेर्‍यांद्वारे तपास करत आहेत.