कॉंग्रेस सत्तेवर आल्यास तिन्ही प्रकल्प रद्द

0
40

>> कॉँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांचे आश्‍वासन

>> नगर नियोजन कायद्याचे कलम १६-ब रद्द करण्याची ग्वाही

येत्या गोवा विधानसभा निवडणुकीत जर कॉंग्रेस पक्ष स्पष्ट बहुमत मिळवून सत्तेवर आला तर आमचे सरकार गोव्याचा विनाश करणारे तिन्ही केंद्रीय प्रकल्प रद्द करणार असे पक्षाचे गोवा प्रभारी दिनेश गुंडू राव यांनी यापूर्वीच सांगितले आहे. तसेच तसेच सत्तेवर आल्यास नगर नियोजन कायद्याचे कलम १६-ब रद्द करू.

मासळी कुजू नये म्हणून त्यावर फार्मेलीनचा शिडकाव करण्यात आला आहे की काय हे तपासण्यासाठी प्रयोगशाळा स्थापन करणार असल्याचे कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी म्हटले आहे. गोव्याच्या पर्यावरणासाठी हानिकारक ठरणारे तीन केंद्रीय प्रकल्प रद्द केले जाणार असल्याचे प्रभारी दिनेश गुंडूराव यांनी १८ जून रोजी लोहिया मैदान येथे जाहीर केले होते याची आठवण यावेळी चोडणकर यांनी करून दिली आहे.

कॉंग्रेस पक्ष सत्तेवर आल्यानंतर नगर नियोजन काद्याचे कलम १६-ब रद्द करून सदर कलमाखाली रुपांतरीत करण्यात आलेली जमीन परत मूळ पदावर आणली जाईल. भाजप सरकारच्या ‘सुटकेस टू सुटकेस’ धोरणाखाली लोकांनी कलम १६-ब चा वापर करून आपली जमीन रुपांतरीत करू नये, असा इशारा यापूर्वीच आम्ही दिला होता, असे चोडणकर यांनी स्पष्ट केले आहे.
गोव्याची अस्मिता राखणे हे कॉंग्रेस पक्षाचे कर्तव्य असून लोक भावनांचा आदर करून जनतेचा विश्‍वास आम्ही संपादन करणार असल्याचेही चोडणकर यांनी म्हटले आहे.

मत्स्य चाचणी केंद्राची उभारणी
सत्तेवर आल्यानंतर येत्या गोवा घटक राज्य दिनापूर्वी म्हणजेच ३० मे २०२२ पूर्वी आम्ही गोव्यात मत्स्य चाचणी केंद्राची उभारणी करून गोमंतकीयांना फार्मेलीनचा लवलेश नसलेले मासे उपलब्ध करून देणार असल्याचेही चोडणकर यांनी स्पष्ट केले आहे.

युवा कार्यकर्त्यांचा दिल्लीत सत्कार
गोव्यातील युवा कॉंग्रेस नेत्यांनी कोरोनाच्या दुसर्‍या लाटेच्यावेळी केलेल्या समाजसेवेची कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी दखल घेतली. या युवा कॉंग्रेस कार्यकर्त्यांचा नवी दिल्ली येथे सत्कार करण्यात आला. या नेत्यांनी कोविड महामारीच्या काळात कोविड रुग्णांना प्राणवायू सिलिंडरसह अत्यावश्यक वस्तू पुरवण्याचे जे काम केले त्याबद्दल राहुल गांधी यांनी अध्यक्ष वरद म्हार्दोळकर, सरचिटणीस ग्लेन काब्राल, अर्चित नाईक, उत्तर गोवा जिल्हाध्यक्ष विवेक डिसिल्वा, म्हापसा युवक कॉंग्रेस अध्यक्ष हिमांशू तिवरेकर, सांतआंद्रे युवक अध्यक्ष साईश आरोसकर आदींचा नवी दिल्ली येथे कॉंग्रेस मुख्यालयात आयोजित एका कार्यक्रमात राहुल गांधी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.