बाणावली बलात्कार प्रकरणी संशयितांना ४ दिवसांची कोठडी

0
90

बाणावली समुद्र किनार्‍यावर दोन अल्पवयीन मुलींवर चौघा तरुणांनी बलात्कार केल्याची घटना रविवारी मध्यरात्री उशिरा घडली. या प्रकरणी चौघांना अटक केली असून, त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

या प्रकरणी कोलवा पोलिसांनी असिफ हटेली (२१, रा. गृहनिर्माण वसाहत, घोगळ), राजेश माने (३३,), गजानंद चिंचणकर (३१) आणि यतीन यब्बाल (१९, सर्व रा. झरीवाडा दवर्ली) यांना अटक केली आहे.
सविस्तर माहितीनुसार, दोन अल्पवयीन मुली आपल्या मित्रांसमवेत वाढदिवस साजरा करण्यासाठी बाणावली किनार्‍यावर गेल्या होत्या; मात्र त्यांना बराच उशिर झाला. त्याचवेळी एक जण तोतया पोलीस बनून तेथे आला. त्याने दोन्ही मुली व त्यांच्या मित्रांना धमकी देत शिविगाळ केली. त्यांना अटक करण्याची धमकी दिली. त्यानंतर त्या तोतया पोलिसाने अन्य तिघांना बोलावून त्या मुलींवर बलात्कार केला.

बाणावली किनार्‍यावरील एका हॉटेलजवळ रविवारी मध्यरात्री ३.३० वाजता ही घटना घडली. घटनेनंतर त्या मुलींनी घाबरून आरडाओरड केली; मात्र पहाटेच्या वेळी किनार्‍यावर सामसूम असल्याने कोणीच त्यांच्या मदतीला पोहोचू शकले नाही. संशयितांनी त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली, तसेच मुलीच्या मित्रांकडून ५० हजारांची मागणी केली, ते न दिल्यास बदनामीची धमकी दिली.

पीडित मुलींनी या प्रकरणी रविवारी सकाळी कोलवा पोलीस स्थानकावर तक्रार नोंदवताच ते तोतया पोलीस असल्याचे स्पष्ट झाले. या घटनेची माहिती मिळताच दक्षिण गोव्याचे पोलीस अधीक्षक पंकजकुमार सिंग व उपअधीक्षक हरीश मडकईकर हे कोलवा पोलीस स्थानकात दाखल झाले व चौकशीला सुरुवात केली. दरम्यान, त्या मुली व त्याच्या मित्रांचे नातेवाईक पोलीस स्थानकात पोहोचले. पोलिसांनी सामाजिक कार्यकर्त्या आवडा व्हिएगश यांना बोलावून मुलींकडून अत्याचाराच्या घटनेची माहिती मिळवली.

पोलिसांनी तपासाची चक्रे गतिमान करत सर्व संशयितांना अटक केली. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. संशयितांना काल न्यायालयासमोर हजर केले असता, त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.